साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळावे; शरद पवारांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 03:45 PM2023-01-28T15:45:32+5:302023-01-28T15:46:10+5:30
साखर कारखानदारीने आधुनिकीकरणाचा अवलंब करावा
कुंडल : दुष्काळी भाग असला तरी स्वाभिमानाने जगण्याची उर्मी येथील माणसांमध्ये आहे. त्यामुळे पाणी नसले तरी व्यवसायांच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन हे लोक सन्मानाने जगत आहेत. सांगलीच्या कारखानदारीचा देशात लौकिक आहे. येथील साखर कारखानदारीने आधुनिकीकरणाचा अवलंब करावा. डिस्टिलरी, इथेनॉलनंतर आता सीएनजी, हायड्रोजन गॅस निर्मितीकडे वळण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
कुंडल (ता. पलूस) येथे शुक्रवारी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण, जन्मशताब्दी सांगता समारंभ, ‘क्रांतीदर्शी’ या जन्मशताब्दी स्मृती अंकाचे प्रकाशन, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना विस्तारीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पवार म्हणाले, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्यासह नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर सामान्यांना अभिप्रेत आर्थिक विकास केला. या परिसरातील माणसाला येथेच स्वाभिमानाने जगण्यासाठी पाणी योजना सुरू केल्या. साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालविली. क्रांतिअग्रणी कारखान्याला दरवर्षी पुरस्कार मिळतो, हे अरुण लाड यांच्या काटेकोर नियोजनामुळेच होते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, जी. डी. बापूंनी सत्तेची पर्वा व सत्तेसाठी राजकारण केले नाही. त्यांचा वारसा अरुण लाड व शरद लाड जपत आहेत. सध्या देशात सत्तेसाठी समाजामध्ये दुही माजविली जात आहे.
आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, बापू व पतंगराव कदम यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. भविष्यातही दोन्ही कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते कायम राहील.
आमदार अरुण लाड म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा बसविल्याशिवाय बापूंच्या स्मारकाचे लोकार्पण करणार नाही, अशी भूमिका होती. त्यामुळे क्रांतिसिंहांच्या पुतळ्याला शासनाचा निधी उपलब्ध झाला.
यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, आमदार बबनराव शिंदे, सुमनताई पाटील, विक्रमसिंह सावंत, शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिवराव पाटील, अण्णासाहेब डांगे, शिवाजीराव नाईक, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, किरण लाड, उदय लाड, दिलीप लाड, प्रतीक पाटील, रोहित पाटील, धनश्री लाड, अविनाश पाटील उपस्थित होते.
जयंतरावांचा दोन काकांना टोला
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणात भाजपला टोले लगावताना खासदार पाटील यांना ‘संजयकाका, कानात बोटे घाला,’ असे सांगितले आणि एकच हशा पिकला. वैभव नायकवडी यांना उद्देशून ते म्हणाले, ‘अहो वैभवकाका, नागनाथ अण्णांनी जातीयवादींना कधीही आश्रय दिला नाही,’ यावेळीही खसखस पिकली.