सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन पेटले; ठिकठिकाणी चक्काजाम, वाहनांच्या रांगा
By शीतल पाटील | Published: November 19, 2023 07:27 PM2023-11-19T19:27:49+5:302023-11-19T19:28:00+5:30
मोठा पोलिस बंदोबस्त
सांगली : दोन दिवसांत एफआरपी द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिला आहे. त्यानुसार रविवारी सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये आणि पहिली उचल साडेतीन हजार रुपये देण्याचा मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेने रविवारी इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाटा परिसरात चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बसमधून प्रवास करणाऱ्या अनेकांना खाली उतरून पायपीट करावी लागली.
इस्लामपूर येथील आंबेडकर नाक्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पलूसच्या मुख्य चौकात चक्काजाम करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विजापूर गुहागर महामार्गावरच ठिय्या मारल्याने जवळपास एक तासाच्या वर मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती.
शिराळा येथील बाह्यवळण रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास आंदाेलन सुरू होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. शिगाव (ता. वाळवा) येथे सकाळी अकराच्या सुमारास मराठी शाळेनजीक राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन झाले. देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. येथेही दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.