जिल्ह्यात ११,६०८ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले

By admin | Published: August 5, 2016 11:29 PM2016-08-05T23:29:16+5:302016-08-06T00:25:55+5:30

कारखानदारांची होणार अडचण : ऊस उत्पादकांना मिळणार योग्य दर; यंदा पळवापळवी

Sugarcane area decreased by 11,608 hectare | जिल्ह्यात ११,६०८ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले

जिल्ह्यात ११,६०८ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले

Next

सांगली : दुष्काळ आणि ऊस दरावरून शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडून अडवणूक होत असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक अन्य पिकांकडे वळल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. २०१५-१६ वर्षाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखानदारांना ८३ हजार ९६६ हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध झाला होता. चालूवर्षी ११ हजार ६०८ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटल्यामुळे येत्या हंगामासाठी ७२ हजार ३५८ हेक्टर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. परिणामी कारखानदारांमध्ये उसासाठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
संघटनांच्या आंदोलनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील तीन वर्षे चांगला दर मिळाला. पण, २०१५-१६ च्या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे मोठे नुकसान झाले. यातच साखर कारखानदारांकडूनही अडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. पहिल्या हप्त्याचे बिलही संघटना आणि साखर कारखानदारांच्या राजकीय कुरघोड्यात उशिरा मिळाले. काही साखर कारखानदारांनी तर साखरेचे दर उतरल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची दोन महिने बिले दिली नाहीत. जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षाही कमी दर शेतकऱ्यांना दिला आहे. उसाला मिळणारा दर आणि त्याचा उत्पादन खर्च लक्षात घेतल्यास, ते परवडत नसल्यामुळे शेतकरी पर्यायी पिकाकडे वळला आहे. मिरज, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यातील शेतकरी सोयाबीन, भाजीपाला पिकाकडे सर्वाधिक वळला आहे. वाळवा तालुक्यात २०१५-१६ या वर्षात २९ हजार ६०५ हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये पाच हजार ४५७ हेक्टरनी उसाचे क्षेत्र घटले असून २०१६-१७ वर्षासाठी २४ हजार १४८ हेक्टर क्षेत्र आहे. तासगाव तालुक्यात सर्वाधिक ५० टक्क्यांनी उसाच्या क्षेत्रामध्ये घट झाली आहे. या तालुक्यात दुष्काळामुळे ऊसक्षेत्र घटल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरज तालुका वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र घटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sugarcane area decreased by 11,608 hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.