'स्वाभिमानी'ची जयसिंगपूरमध्ये उद्या ऊस परिषद, सांगलीतून २५ हजार शेतकरी जाणार
By अशोक डोंबाळे | Published: November 6, 2023 12:29 PM2023-11-06T12:29:38+5:302023-11-06T12:30:08+5:30
मागील हिशोब चुकता न केल्यास कारखानदार-शेतकऱ्यांत संघर्ष अटळ
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बाविसावी ऊस परिषद मंगळवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होत आहे. या परिषदेच्या तयारीमध्ये कार्यकर्ते व्यस्त असून, सांगली जिल्ह्यातून २५ हजार शेतकरी जाणार आहेत, असा विश्वास स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केला.
खराडे म्हणाले, जयसिंगपूर येथील विक्रमसिंह घाटगे मैदानावर मंगळवारी दुपारी २ वाजता ऊस परिषद होणार आहे. परिषदेला माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, संदीप जगताप, सावकार माडणाईक मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला राज्यभरातील एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असा अंदाज घेऊन कार्यकर्ते नियोजन करत आहेत. या ऊस परिषदेत यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांकडून किती ऊस दर घ्यायचा हे जाहीर होणार आहे.
उसाचा वाढता उत्पादन खर्च, उसाची टंचाई, साखरेची टंचाई, जगभरात वाढत जाणारे साखरेचे दर या सर्व बाबींचा विचार करून यंदा ऊस दर जाहीर केला जाईल. ऊस परिषदेत ठरलेला दर देण्याची तयारी जे साखर कारखाने दर्शवितील तेच कारखाने सुरू राहतील, अन्य सर्व साखर कारखान्यांची ऊसतोड बंद पाडणार आहे, तसेच मागील गळीत हंगामासाठी गेलेल्या उसाला प्रतिटन चारशे रुपये दिले पाहिजेत, यासाठीही लढा सुरूच असणार आहे.
ऊसटंचाई, तोडीसाठी गडबड नको
शेतकऱ्यांनी ऊस दराचा प्रश्न सुटल्याशिवाय ऊस तोडी घेऊ नयेत, कारण यंदा उसाची प्रचंड टंचाई आहे. साखर कारखान्यांमध्ये ऊस नेण्यासाठी स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा उठवून चांगला ऊस दर मिळू शकतो; पण त्यासाठी शेतकऱ्यांनी दोन आठवडे ऊसतोडी घेतल्या नाहीत, तर वाढीव ऊस दराची लढाई जिंकता येणार आहे. वाहनधारकांनीही ऊस वाहतूक करू नये, वाहनधारकांच्या अडचणीच्या काळात संघटनाच त्यांच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक आणि वाहनधारकांनी जरा सबुरीने घ्यावे, असे आवाहन खराडे यांनी केले आहे.