साखर कारखानदारांच्या काटामारीला ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:21 PM2018-11-26T23:21:39+5:302018-11-26T23:21:44+5:30
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर कमी दिला आहे. त्याचबरोबर आता वजनात काटामारी करुन काही साखर कारखाने पुन्हा ...
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर कमी दिला आहे. त्याचबरोबर आता वजनात काटामारी करुन काही साखर कारखाने पुन्हा शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा ऊस उत्पादकांचा आरोप आहे. कारखान्याच्या आणि बाहेरच्या काट्यावरील वजनात दीड-दोन टनाचा फरक पडत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत.
सध्या ऊस दरापेक्षा काटामारी हाच चर्चेचा विषय आहे. साखर कारखान्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन-काटे बसविलेले असूनही त्यात मोठ्या प्रमाणात काटामारी केली जाते. शेतकरी संघटनाही ऊस दराच्या आंदोलनात यशस्वी होतात, पण काटामारी रोखण्यात मात्र अपयशी ठरतात. संघटनांनी जाब विचारल्यावर, कारखानदार काटामारीचा आरोप फेटाळून लावत आहेत.
प्रत्येक ट्रॅक्टरमधून सरासरी १५ ते २० टन, तर ट्रकमधून १२ ते १५ टन उसाची वाहतूक केली जात आहे. अशा ट्रक अथवा ट्रॅक्टरमागे दीड ते दोन टन काटामारी केली जाते. या साखर कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकाºयांचा फारसा अंकुश नसल्याचाही आरोप आहे. तपासणीपूर्वी अधिकाºयांकडून वजन-काट्याच्या तपासणीची कल्पना कारखानदारांना दिल्यामुळे काटामारीची यंत्रणा बंद ठेवली जाते. त्यामुळे अधिकारी तपासणीनंतर लगेच कारखान्याचा वजन-काटा उत्तम असल्याचे प्रमाणपत्र देतात.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या वजन-काट्यांची एकाचवेळी अचानक तपासणी केल्यास गोलमाल उजेडात येऊ शकते.
शेतकरी स्वत: वजन करायला जात नाही; पण शेतकरी आणि ऊस तोडणारे मजूर नजरेने वाहनामध्ये ऊस किती टन आहे, हे ओळखतात. काही शेतकºयांनी अन्य काट्यावर वजन करून ऊस नेला तर तो ऊस कारखानदार स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आहेत.
खासगी वजन काटे ‘मॅनेज’
खासगी वजनकाटे चालविणाºयांना साखर कारखान्यांकडून हप्ते मिळतात. त्यामुळे एखाद्या शेतकºयाने तेथे वजन केल्यास ती माहिती साखर कारखान्याला त्वरित कळविली जाते. यावर पर्याय म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी खासदारांच्या स्थानिक विकासनिधीतून ग्रामपंचायतींना वजन काटे देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र साखर कारखान्यांचा दबाव असणाºया ग्रामपंचायती अशाप्रकारचा निधी घेण्यास तयार होत नाहीत.
वाहन मालक व मजुरांनाही फटका
ऊसतोडणी मजुराला मजुरी वजनावर मिळते. उसाची वाहतूक करणाºयांना भाडे वजनावर मिळते. त्यामुळे काटा मारल्यानंतर शेतकºयांचे तर नुकसान होतेच, पण ऊस तोडणाºया मजुरांचे आणि वाहतूक करणाºया वाहनमालकांचेही नुकसान होते.
‘कारखाने बंद पाडू’
काही साखर कारखाने वजनात काटामारी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत लवकरच वैधमापन विभागाकडे लेखी तक्रार करू. त्यांनी कारवाई केली तर ठीक़, नाही तर कारखान्यांचे हंगाम बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिला आहे.