लोकरी माव्यामुळे ऊस उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:29+5:302021-07-12T04:17:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्यात ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात लोकरी मावा रोगाचा फैलाव होत असल्याने ऊस उत्पादक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगाव तालुक्यात ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात लोकरी मावा रोगाचा फैलाव होत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. हुकमी व चांगला मोबदला देणाऱ्या ऊसाच्या पिकावरील लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.
हवामानातील सततच्या बदलामुळे व पावसाने दडी मारल्यामुळे ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात लोकरी मावा रोगाचा फैलाव झाला आहे. विशेषतः कडेगाव तालुक्याच्या सोनहिरा खोऱ्यात सध्या मोठ्या प्रमाणात लोकरी माव्याची कीड आली असून, तिचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे. लोकरी माव्याने ऊसाची पाने पांढरी तर वाडे काळे पडले आहेत. ही कीड ऊसातील हरितरस शोषून घेत असल्याने ऊसाची वाढ खुंटत आहे. शेतीतील नवीन तंत्रज्ञान, ताकारी व टेंभू सिंचन योजनांमुळे झालेली पाण्याची अपेक्षित उपलब्धता यामुळे तालुक्यातील डोंगरी विभागात ८ ते ९ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. या ऊसाला लोकरी माव्याने विळखा घातल्याने मोठ्या आर्थिक हानीची भीती व्यक्त होत आहे. आगामी गळीत हंगामात गाळपासाठी जाणाऱ्या ऊसाची चांगली वाढ झाली आहे. यामुळे त्यावर औषध फवारणी करणेही अवघड असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागाने लोकरी मावाबाधित शेतकऱ्यांना या रोगाच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. या संकटाचा परिणाम साखर उद्योगावरही होणार असल्याने साखर कारखान्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना औषध फवारणीचे प्रात्यक्षिक देऊन प्रसंगी औषध पुरवठाही होणे गरजेचे आहे. यापूर्वी आलेल्या संकटकाळात लोकरी मावा खाणारी मित्र कीड विकसित झाली आहे.
ही मित्र कीड या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना ऊस शेतीत सुगीचे दिवस आले असताना आता मात्र लोकरी मावा प्रादुर्भावाचे संकट आ वासून उभे असल्याने ऊस उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
फोटो : ११ कडेगाव १
ओळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथे शेतकरी रामचंद्र महाडिक यांच्या शेतातील ऊसात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.