ऊस उत्पादक नेत्यांमुळेच कोंडीत!

By Admin | Published: November 3, 2015 11:08 PM2015-11-03T23:08:50+5:302015-11-04T00:08:27+5:30

वाळवा-शिराळ्याचे चित्र : राजू शेट्टी, जयंतरावांकडे लक्ष, गळीत हंगामावर प्रश्नचिन्ह

Sugarcane growers due to productive leaders! | ऊस उत्पादक नेत्यांमुळेच कोंडीत!

ऊस उत्पादक नेत्यांमुळेच कोंडीत!

googlenewsNext

अशोक पाटील - इस्लामपूर--साखर कारखानदारांचे नेते आमदार जयंत पाटील ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम एकरकमी देण्यास आग्रही आहेत, परंतु त्यांच्या स्वत:च्याच राजारामबापू कारखान्याने एकरकमी एफआरपी दिलेली नाही, तर दुसरीकडे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एफआरपीसाठी आंदोलनाचा फड पेटवण्याच्या तयारीत आहेत. तथापि स्वाभिमानीच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाळवा, शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी भूमिका बदलली असून, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरच तोफ डागली आहे. गळीत हंगामाआधी स्वाभिमानी संघटना एफआरपी दरासाठी आंदोलनाचा फड पेटवण्याच्या तयारीला लागली आहे, तर दुसरीकडे वाळवा, शिराळ्यातील साखर कारखानदारांचे नेते आमदार जयंत पाटील यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत गळीत हंगाम सुरू करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
यावर्षी पावसाने दडी मारली आहे. विहिरी, नदीला कमी प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे ऊस जगवण्याची कसरत करावी लागत आहे. कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस नेणे गरजेचे आहे. परंतु आमदार पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. या दोघांच्या भूमिकेमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे.
वारणा-कृष्णा खोऱ्यात ऊस उत्पादकांची संख्या मोठी आहे. सध्या त्यांच्या हातात उसाचे पैसे पडले नसल्याने दिवाळीची खरेदी अद्याप झालेली नाही. त्यामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. पतसंस्था, खासगी सावकारांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे पैशाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे.

ऊस गेला शेजारच्या जिल्ह्यात
या परिसरातील बहुतांशी बड्या शेतकऱ्यांनी परिसरातील कारखाना सुरू होण्याअगोदरच शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पाठवला आहे. सभासदांच्या उसाला वेळेत तोड मिळाली नाही, तर बाहेरचे कारखाने ऊस पळवणारच. जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या चुकीच्या धोरणामुळे आता शेतकरी ऊस सोडून इतर पिकांकडे वळू लागला आहे.

पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परिसरातील पाणीसाठा कमी झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत ऊस गळितासाठी गेला पाहिजे. शासनाने जाहीर केलेली एफआरपी मिळणारच आहे. ती टप्प्या-टप्प्याने मिळाली तरी गैर नाही. नुसत्या एफआरपीसाठी आंदोलन करणे म्हणजे शेट्टी आणि खोत यांचा ढोंगीपणा आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी ते आता ऊस उत्पादकांचे प्रश्न घेऊन सरकारला भीती दाखवत आहेत.
- बी. जी. पाटील, संस्थापक, बळिराजा संघटना.

Web Title: Sugarcane growers due to productive leaders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.