Sangli News: पाणी योजनांच्या वसुलीस ऊस बाहेर गेल्याने फटका, कडेगावातील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:11 PM2023-03-21T17:11:36+5:302023-03-21T17:13:15+5:30
बाहेरचे कारखाने सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील ऊस नेतात मात्र पाणीपट्टी वसुलीबाबत उदासीनता दाखवितात
प्रताप महाडीक
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ऊस पलूस, कडेगावसह कऱ्हाड व खटाव तालुक्यातील कारखाने नेतात. मात्र बाहेरील व कर्नाटकातील काही साखर कारखान्यांनीही यंदा तालुक्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर नेला. ऊस कोणत्या कारखान्याला द्यावा, हे शेतकऱ्यांच्या मर्जीचा विषय असला तरी बाहेरच्या कारखान्यांना ऊस गेल्याने ताकारी, टेंभू सिंचन योजनांची पाणीपट्टी व सहकारी सोसायट्यांच्या पीककर्ज वसुलीवर परिणाम होत आहे.
कडेगाव तालुक्यात राज्याबाहेरील विशेषतः कर्नाटकातील काही साखर कारखाने ऊस घेऊन जातात. या कारखान्यांनी संबंधित गावातील शेती पिकांसाठी सिंचन योजना तसेच पीक कर्ज देणारी सहकारी सोसायटीच्या वसुलीसाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र ते होत नाही. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांमुळे कडेगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. साधारणपणे २५ ते ३० लाख टन उसाचे उत्पन्न होते. सध्या गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. काही कारखाने बंद झाले आहेत.
ऊस बाहेरील साखर कारखान्याला गेला. बिलही शेतकऱ्यांना मिळाले. मात्र पाणीपट्टी आणि पीक कर्ज भरले नाही असे कित्येक शेतकरी आहेत. उसाचे क्षेत्र मोठे असल्याने यावर्षी वेळेत ऊसतोड मिळेल की नाही अशी शक्यता असल्याने काही शेतकऱ्यांनी तोड मिळेल त्या कारखान्याला ऊस दिला. हे बाहेरचे कारखाने सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील ऊस नेतात मात्र पाणीपट्टी वसुलीबाबत उदासीनता दाखवितात. स्थानिक कारखान्यांना ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांत स्पर्धा दिसते. मात्र तोड मिळत नसल्याने नाइलाज झाला म्हणूनही काही शेतकरी बाहेर ऊस देतात.
प्रामाणिकांना भुर्दंड
सिंचन योजनांचे पाणी वापरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची पाणी वसूल होणे गरजेचे आहे मात्र काही शेतकरी जाणीवपूर्वक बाहेरील कारखान्यांना ऊस देऊन विनाकपात बिल घेतात. प्रामाणिक शेतकऱ्यांना याचा भुर्दंड सहन करावा लागतो.