सांगली जिल्ह्यातील ऊस दराची बैठक निष्फळ; कारखानदारांचा निर्णय ‘स्वाभिमानी’ला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:52 AM2023-11-27T11:52:33+5:302023-11-27T11:52:51+5:30

राजू शेट्टींशी चर्चा करणार

Sugarcane rate meeting in Sangli district fruitless, The decision of the factory owners is unacceptable to Swabhimani | सांगली जिल्ह्यातील ऊस दराची बैठक निष्फळ; कारखानदारांचा निर्णय ‘स्वाभिमानी’ला अमान्य

सांगली जिल्ह्यातील ऊस दराची बैठक निष्फळ; कारखानदारांचा निर्णय ‘स्वाभिमानी’ला अमान्य

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन तीन हजार १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदारांनी घेतलेला निर्णय अमान्य असल्याचे सांगत काेल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही ताेडगा हवा, अशी मागणी केली.

कडेगाव येथे रविवारी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने सांगली जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक झाली. बैठकीस खासदार संजय पाटील, क्रांती कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उदगिरी शुगरचे उत्तमराव पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, दत्त इंडियाचे जितेंद्र धारू, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी उपस्थित होते.

ज्या साखर कारखान्यांनी मागील वर्षी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रतिटन २ हजार ९०० पेक्षा जादा दर अदा केलेला आहे. त्यांनी प्रति टन ५० रुपये व २ हजार ९०० पेक्षा कमी दर अदा केलेल्या कारखान्यांनी मागील वर्षाच्या एफआरपीपेक्षा किमान रुपये १०० रुपये जादा अदा करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव दाखल द्यावा. शासन स्तरावरून मंजुरी मिळाल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी, तसेच चालू गळीत हंगामात ३१०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

‘स्वाभिमानी’कडून कोल्हापूर पॅटर्नची मागणी

कडेगाव येथे साखर कारखानदारांची बैठक झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विश्वजित कदम यांची भेट घेतली. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे कारखानदारांनी एफआरपी अधिक शंभर रुपये चालू वर्षीचा ऊसदर जाहीर करावा. तसेच मागील वर्षी तीन हजारपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी १०० रुपये जादा अदा करावे व तीन हजारपेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये जादा अदा करावे, अशी मागणी खराडे व राजोबा यांनी कदम यांच्याकडे केली.

राजू शेट्टींशी चर्चा करणार

कारखानदारांच्या वतीने आमदार विश्वजित कदम हे तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. रविवारच्या बैठकीतील निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अमान्य आहे. यावर कदम यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखानदार व खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


कडेगावातील बैठकीत कारखानदारांनी घेतलेला निर्णय आम्हाला अमान्य आहे. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत. - संदीप राजोबा, कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Sugarcane rate meeting in Sangli district fruitless, The decision of the factory owners is unacceptable to Swabhimani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.