इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला, कराडमध्ये पोलीस बंदोबस्तात ऊस वाहतूक
By प्रमोद सुकरे | Published: November 17, 2022 07:38 PM2022-11-17T19:38:13+5:302022-11-17T19:39:49+5:30
इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला; वाठारात ऊस ट्रँक्टर अडवले
प्रमोद सुकरे
कराड - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ व १८ नोव्हेंबरला दोन दिवसाचे राज्यभर पुकारलेले ऊस तोड बंद आंदोलन कराडात चिघळले आहे. इंदोली येथे बुधवारी रात्री उशिरा अज्ञाताने ऊस वाहतूक करणारा एक ऊस ट्रॅक्टर पेटवून दिल्याने पोलिस सतर्क झाले आहेत. गुरुवारी रात्री पोलीस बंदोबस्तात ऊस वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साखर कारखानदारांनी विना कपात एक रकमी एफ आर पी द्यावी. हंगाम संपल्यावर ३५० रुपये द्यावे. अशी स्वाभिमानीची मागणी आहे. मात्र याकडे कोणीच हवे तसे लक्ष देत नाही. म्हणूनच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १७ व १८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. या २ दिवसात शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नयेत. रस्त्यावरून ऊस वाहतूक करु नये. आंदोलनाला सहकार्य करावे. असे आवाहन संघटनेने केले होते. मात्र तरीही ऊस वाहतूक होत असल्याने इंदोलीत ट्रँक्टर पेटवण्यात आला.त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटणार असे वाटून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला.
दरम्यान दुपारी वाठार ता.कराड येथे संघटनेच्या देवानंद पाटील व कार्यकर्ते यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रँक्टर अडवले. पण पोलिसांनी तेथे जाऊन आंदोलकांना बाजूला केले. व ट्रँक्टर गेले. त्यानंतर सावध झालेल्या पोलीस प्रशासनाने सायंकाळी या परिसरात पोलीस बंदोबस्तात ऊस वाहतुक सुरू ठेवली.त्यामुळे स्वाभिमानिचे कार्यकर्ते आता काय भूमिका घेणार हे पहावे लागेल.