एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची ऊस वाहतूक रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:21 AM2020-12-25T04:21:37+5:302020-12-25T04:21:37+5:30
भिलवडी : एकरकमी एफआरपी न देणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून ऊस वाहतूक रोखणार असल्याची माहिती ...
भिलवडी : एकरकमी एफआरपी न देणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून ऊस वाहतूक रोखणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली. आज, शुक्रवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी प्रतिनिधी या कारखान्यास ऊस घेऊन जाणारी वाहने रोखणार आहेत.
ते म्हणाले, उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. सोनहिरा सहकारी व उदगीर साखर कारखाना या दोनच साखर कारखान्यांनी एकरकमी एफ.आर.पी.नुसार दर दिला आहे. हे दोन कारखाने वगळता इतर कोणत्याही कारखान्याने अद्याप एकरकमी एफ.आर.पी.ची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा केलेली नाही. नोव्हेंबरमध्ये कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या दोन बैठका झाल्या होत्या. पहिली बैठक चर्चेविना निष्फळ ठरली. परंतु १८ तारखेच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा मान्य केला. परंतु कारखाना सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही इतर कोणत्याच कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. कारखान्याच्या व्यवस्थापनाला किंवा संचालक मंडळांना फोनवरून किंवा समक्ष भेटून उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा असे सांगूनदेखील हे कारखानदार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. केंद्र शासनानेसुद्धा एफआरपीसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये गाळप झालेल्या उसाची बिले एकरकमी एफआरपीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून संपूर्ण जिल्ह्यातील ऊस वाहतूक रोखणार आहे.