ऊस वाहतूकधारांची बिले अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:12+5:302021-04-26T04:24:12+5:30
दुधगाव : मिरज पश्चिम भागातील ऊस वाहतूकदारांची मार्च महिन्यापासून लाखो रुपयांची बिले मिळाली नाहीत. ...
दुधगाव : मिरज पश्चिम भागातील ऊस वाहतूकदारांची मार्च महिन्यापासून लाखो रुपयांची बिले मिळाली नाहीत. यामुळे वाहनचालक आर्थिक संकटात सापडला आहे.
या भागातील वाहतूकदारांनी जवळच्या कारखान्यात ऊस वाहतूक केली आहे.
दुधगाव, साळवाडी, माळवाडी, कवठेपिरान, समडोळी, तुंग या मिरज पश्चिम भागात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या ठिकाणी बाहेरगावचे ट्रॅक्टर मालक ऊसतोडीसाठी येतात. शिवाय पश्चिम भागात ऊसपट्टा चांगला असल्यामुळे ट्रॅक्टर मालकांची संख्याही जास्त आहे. अनेक ट्रॅक्टर मालकांनी बँकेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर व ऊसतोडणी मशीन घेतले आहे. मागील हंगामात बाहेरगावची वाहतूक यंत्रणा आली नसल्याने पश्चिम भागातील वाहतूकदारांचा चांगला व्यवसाय झाला आहे. मात्र, त्याची बिले अजून मिळाली नाहीत. यामुळे वाहतूक कंत्राटदार नाराज आहेत; तसेच मुकादम आमच्याकडेदेखील वाहन मालकांचे पैसे अडकल्यामुळे वाहन मालक सध्या चिंतेत आहेत.
एप्रिल महिना संपत आला तरी कारखान्यांनी अजून तोडणी वाहतुकीची बिले न देता नवीन करार सुरू केले आहेत. एकीकडे कारखान्याकडे गतवर्षीची बिले अडकल्यामुळे ट्रॅक्टर मालकांना नवीन वाहतूक करार करणे अवघड झाले आहे.
चौकट
नवीन करार सुरू
करार न करण्याचा इशारा
एकीकडे संपलेल्या गळीत हंगामाची बिले थकीत असताना अनेक कारखान्यांनी २०२१ व २०२२ साठी करार सुरू केले आहेत. नवीन करार सुरू केल्याने आमचे पैसे कधी देणार, असा प्रश्न सध्या वाहनधारक विचारत आहेत.