Sangli: गोटखिंडीत ऊसतोड मजुरांनी कोल्ह्याला बांधून ठेवले, वन विभागाने केली सुटका
By संतोष भिसे | Published: November 18, 2023 02:26 PM2023-11-18T14:26:22+5:302023-11-18T14:26:43+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे ऊसतोड मजुरांनी चक्क कोल्ह्याला झोपडीशेजारी बांधून ठेवले होते. वन विभागाने माहिती मिळताच धाव ...
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे ऊसतोड मजुरांनी चक्क कोल्ह्याला झोपडीशेजारी बांधून ठेवले होते. वन विभागाने माहिती मिळताच धाव घेतली आणि त्याची सुटका केली. त्याला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केेले जाणार आहे.
गोटखिंडी परिसरात ऊसतोडीसाठी मोठ्या संख्येने मजूर आले आहेत. परिसरात ठिकठिकाणी झोपड्यांमधून राहत आहेत. ऊसतोडीदरम्यान, एका मजुराला ऊसाच्या फडामध्ये कोल्हा आढळला. त्यांनी त्याला पकडले. झोपडीशेजारी बांधून ठेवले. शुक्रवारी (दि. १७) एका ग्रामस्थाने याची माहिती प्राणीमित्रांना दिली. ऊसतोड मजूर कोल्ह्यासोबत खेळत असल्याचे सांगितले. त्याला दोरीने फरपटत नेणे, मारहाण करणे असा छळवाद सुरु असल्याची माहितीही दिली. ग्रामस्थाने वन खात्याच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्काचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही. त्यामुळे नेचर कॉन्जर्वेशन सोसायटीचे डॉ. हर्षद दिवेकर यांच्याशी संपर्क केला.
दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनंतर सांगलीचे सहाय्यक उप वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांनी कोल्ह्याच्या सुटकेसाठी कार्यवाही केली. इस्लामपूर वनविभागाला कारवाईचे आदेश दिले. वनरक्षक कोळेकर गोटखिंडी येथे मजुरांच्या वस्तीतून कोल्ह्याला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून निसर्गात मुक्त करण्यात येईल असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
सापळ्यात अडकला कोल्हा
ऊसामध्ये काही शेतकरी रानडुकरांना पकडण्यासाठी फासकी लावतात. हा कोल्हा त्या फासकीत अडकला होता. मजुरांना दिसताच त्याला ताब्यात घेऊन वस्तीमध्ये डांबून ठेवले होते.