साखरेच्या दरवाढीने तिळगुळावर ‘संक्रांत’!
By admin | Published: January 8, 2016 11:40 PM2016-01-08T23:40:42+5:302016-01-09T00:45:06+5:30
दर वाढले : जिल्ह्यातील व्यावसायिकांनाही बसतेय महागाईची झळ
अविनाश कोळी -- सांगली -साखरेचे गेल्या दोन महिन्यात वाढत असणारे दर, मजुरी व गॅसच्या दरातील वाढ यामुळे यंदा तिळगुळावर आणि पर्यायाने उत्पादकांवर ‘संक्रांत’ आली आहे. गतवर्षी ३२ ते ३४ रुपये किलो असणारा तिळगूळ यंदा ४० ते ४२ रुपयांवर गेला आहे. महागाईची झळ सर्वांनाच बसत असल्याने बाजारात सध्या संक्रांतीच्या या गोड सणालाही मंदीचा कडवटपणा चिकटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असा संदेश एकमेकांना देत तिळगुळाचा गोडवा चाखला जातो. संक्रांतीच्या सणाचा हा गोडवा प्रतिकूल परिस्थितीतही कायम ठेवण्याची परंपरा जपली जाते. यंदाही परंपरेप्रमाणे हा सण साजरा करताना, महागाईचा कडवटपणाही तिळगुळाच्या गोडीने कमी होईल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. कारण महागाईचा कडवटपणा आता तिळगुळालाही चिकटला आहे. हा कडवटपणा थोडासा कमी करण्याचा प्रयत्न कमी झालेल्या तिळाच्या दराने केला असला तरी, त्याचा उतारा फारसा कामी आला नाही. दोन महिन्यांपूर्वी साखरेचे दर २५ ते २७ रुपये किलोच्या घरात होते. ऐन संक्रांतीच्या तोंडावर हा दर ३२ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे तिळगुळाला याचा फटका बसला. गतवर्षी संक्रांतीच्यावेळी साखरेचा दर २७ ते २८ रुपये किलोच्या घरात होता. तुलनेने यंदा ५ रुपयांची वाढ दिसते. त्यामुळे तिळगुळाचे दर वाढविण्यात आले आहेत.
गतवर्षाच्या तुलनेत प्रति किलोला तिळगुळाच्या दरात ८ ते १० रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. साखरेवर तिळगुळाच्या दराची मात्रा अवलंबून असल्याने, साखरेचे दर वाढतील तसे व्यावसायिकांच्या चिंतेची रेषाही वर जाऊ लागली होती. दरवाढीचा हा झटका तिळाच्या कमी झालेल्या दराने थोडा कमी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी असणारा तिळाचा दर २० ते ३० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे रेवडीच्या दरात फार वाढ होऊ शकली नाही. गतवर्षाच्या तुलनेत पंधरा ते वीस रुपयांची वाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.
मजुरीतही वाढ
तिळगूळ उत्पादकांना पदार्थांच्या दरवाढीबरोबरच मजुरी वाढीचाही फटका बसला आहे. तिळगूळ उत्पादकांनी सांगितले की, गतवर्षी आठ तासांकरिता कामगारांना ८० रुपये द्यावे लागत होते. आता यंदा १२० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. तरीही वाढत्या मजुरीमुळे तिळगुळाच्या दरावर परिणाम होऊ दिलेला नाही.
असे आहेत दर (प्रति किलो)
पदार्थ गतवर्षी यंदा
साखर रु. २७-२८रु. ३२-३३
शेंगदाणा ६0-६२७५-८0
गूळ२८३२-३५
तीळ१५0११0
तिळगूळ३२-३४४0-४२
रेवडी१00-११0१३0-१४0
तीळवडी१२0१६0
यंदा तिळगूळ उत्पादकांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे. साखर, शेंगदाणा यांच्या दरात वाढ होऊनही तुलनेते तिळगुळाच्या दरात कमी वाढ केली आहे. ग्राहकांपेक्षा उत्पादकांनाच अधिक नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा बाजारात सणाचा उत्साह या दरवाढीमुळे कमी झाल्याचे जाणवत आहे.
- गणपती जाधव, तिळगूळ, रेवडी उत्पादक
खरेदीदारांचा थंडा प्रतिसाद
अनेक व्यावसायिकांनी, तिळगुळाच्या खरेदीला अजून म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नसल्याचे सांगितले. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला तसेच संक्रांतीपूर्वी दोन-तीन दिवसात होणाऱ्या तिळगूळ खरेदीवर यंदाच्या उत्साहाचे चित्र स्पष्ट होईल, असे व्यावसायिकांनी सांगितले.