सुहेल शर्मा यांचीही विजयी सलामी! सांगली महापालिका निवडणूक : अनुचित प्रकार, मारामारीला आळा; शांततेत प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:00 AM2018-08-05T00:00:03+5:302018-08-05T00:00:34+5:30
महिन्याभरापासून सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीचे वादळ अखेर शुक्रवारी शांत झाले. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यात आली.
सचिन लाड ।
सांगली : महिन्याभरापासून सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीचे वादळ अखेर शुक्रवारी शांत झाले. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी निवडणुकीतून विजयी सलामी दिली आहे. ‘बेसिंग पोलिसिंग’वर भर देऊन काम केल्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
शर्मा यांनी तीन महिन्यांपूर्वीच निवडणुकीच्या अनुषंगाने बॅटिंग सुरूकेली होती.
तडीपार, स्थानबद्ध, मोक्का या कारवाईचे चौकार आणि षटकार ठोकले. अवैध धंदेवाल्यांना जम बसवू दिला नाही. प्रतिबंधात्मक कारवाईभर दिला. गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली. ‘कोम्बिंग आॅपरेशन’, ‘आॅलआऊट’ मोहीम यासारखे प्रयोग केले. या कारवाईचा गुन्हेगारांनी धसका घेतला. पोलीस कारवाईचा ससेमीरा टाळण्यासाठी अनेक गुन्हेगार पडद्याआड गेले. आचारसंहिता लागताच शर्मा यांनी शहरात येणाºया प्रत्येक मार्गावर नाकाबंदीचे पॉर्इंट लावले. या पॉर्इंटवर पोलीस चौक्या उभ्या केल्या. दारूच्या नशेत वाहन चालविणारे तळीराम तर सायंकाळी सातनंतर रस्त्यावर दिसत नव्हते. रात्री नऊनंतर शहर चिडीचूप होत असे.
महापालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. निकालानंतरही अनुचित प्रकार घडला नाही. कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी सोडली, तर मारामारी अथवा वादावादीचे प्रकार घडले नाहीत. शर्मा यांनी कारवाईबाबत घेतलेला आक्रमक पवित्रा आणि त्यांच्या शिस्तबद्धतेपुढे सर्वांना झुकावे लागले. शर्मा यांच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे अधिकाºयांचीही धावपळ झाली नाही. शहर शांत ठेवण्यासाठी शर्मा व त्यांच्या ‘टीम’ने कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
खडतर काळात सूत्रे
पदाची सूत्रे हाती घेऊन सुहेल शर्मा यांना अजून वर्षही पूर्ण झालेले नाही. पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे खून प्रकरण घडले आणि शर्मा यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे आली. तो काळ आव्हानात्मक होता. पोलीस दलाचे खच्चीकरण झाले होते. गुन्ह्यांचा आलेख वाढला होता. घरफोडी, चोरी, चेनस्नॅचिंग या गुन्ह्यांनी कळस गाठला होता. पोलिसांच्या असहायतेचा गुन्हेगारांनी गैरफायदा घेतला. पुढे महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली होती. अशा स्थितीत शर्मा यांनी शिस्तबद्ध काम केले.