महाआघाडीकडून लढण्याचा सुहास बाबर यांना प्रस्ताव - खासदार विशाल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 05:37 PM2024-08-21T17:37:54+5:302024-08-21T17:39:32+5:30

लॉजिस्टिक धोरणात भाजप नेत्यांचे अपयश

Suhas Babar should contest the upcoming assembly elections from Mahavikas Aghadi says MP Vishal Patil | महाआघाडीकडून लढण्याचा सुहास बाबर यांना प्रस्ताव - खासदार विशाल पाटील 

महाआघाडीकडून लढण्याचा सुहास बाबर यांना प्रस्ताव - खासदार विशाल पाटील 

सांगली : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवावी, हा माझा आग्रह आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर काही गोष्टींची सोडवणूक मी करून घेतली आहे. मी आटपाडीत काय बोललो, याची माहिती न घेताच उद्धव सेनेचे काही लोक टीव्हीवर झळकण्यासाठी काहीही बोलत आहेत, अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाची फसवणूक थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

विशाल पाटील म्हणाले, खानापूर मतदारसंघातील चार ते पाच इच्छुक हे महायुतीतील पक्षांत आहेत. महाविकास आघाडीकडे आश्वासक चेहरा नाही. त्यामुळे सुहास बाबर यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, हा माझा प्रयत्न आहे. मी तेच बोललो. त्याला स्वतःच्या सोयीसाठी कुणाचा विरोध असेल तर मी प्रयत्न थांबवतो. टीव्हीवर चेहरा दिसावा म्हणून कुणी काही बोलू नये. आघाडी धर्माची जबाबदारी सर्वांची आहे. ओबीसी मेळाव्याबाबत माझ्यावरील टीका ही भाजप नेत्यांची राजकीय स्टंटबाजी आहे.

ओबीसींबाबत मी चुकीचे बोललो होतो, असे म्हणणाऱ्यांनी बिरोबाचा भंडारा उचलावा, असे आव्हान त्यांनी दिले. काँग्रेस नेत्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपच्या कंपूने थांबवावा. पडळकरांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देतो म्हणणाऱ्यांवर बोलावे. त्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. जतमध्ये कार्यक्षम काँग्रेस आमदार आहेत, त्यांना डॅमेज करण्यासाठी ते काँग्रेसच्या विरोधात बोलत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

संजय पाटील यांच्यापेक्षा जादा चर्चेत सहभाग

माजी खासदार संजय पाटील यांनी दहा वर्षांत संसदेत जेवढ्या चर्चेत सहभाग घेतला, त्याहून अधिक चर्चेत मी पहिल्या अधिवेशनात सहभागी झालो, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला. संसदेत बोलण्यासाठी लोकांचे विषय माहिती असावे लागतात. त्यासाठी लोकांत जावे लागते, संसद अध्यक्ष आणि आपल्या नेत्यांना विषयाचे महत्त्व समजावून द्यावे लागते, त्यानंतर संधी मिळते. प्रश्नच माहिती नसतील तर बोलणार काय, अशी टोलेबाजी त्यांनी केली.

लॉजिस्टिक धोरणात भाजप नेत्यांचे अपयश

विशाल पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या लॉजिस्टिक धोरणात सांगलीचा समावेश नाही. मिरज रेल्वे जंक्शन असताना सांगलीला डावलून कोल्हापूर, इचलकरंजीचा समावेश होतो. तेथे भाजपचा एकही आमदार नाही. सांगली, मिरजेत भाजपचे आमदार आहेत, पालकमंत्री भाजपचे आहेत, तरीही सांगलीचे नाव नाही. माजी खासदार निवडणुकीपुरते त्यावर बोलले. या अकार्यक्षम नेत्यामुळेच ड्रायपोर्ट, एअरपोर्ट, लॉजिस्टिक पार्क सांगलीला मिळू शकलेला नाही.

Web Title: Suhas Babar should contest the upcoming assembly elections from Mahavikas Aghadi says MP Vishal Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.