लग्नात जेवण न वाढल्याने महिलांसह चौघांना मारहाण-मिरजेतील घटना : सहाजणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:51 PM2018-05-07T22:51:22+5:302018-05-07T22:51:22+5:30
सांगली : लग्नात जेवायला का वाढले नाही, याचा राग मनात धरुन तीन महिलांसह चौघांना लाथा-बुक्क्या व काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
सांगली : लग्नात जेवायला का वाढले नाही, याचा राग मनात धरुन तीन महिलांसह चौघांना लाथा-बुक्क्या व काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मिरजेतील खोतनगरमध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हितेश माने, सोन्या, विनायक (पूर्ण नावे नाहीत) व तीन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. ते मिरजेतील म्हाडा कॉलनीतील इंदिरानगरमध्ये राहतात. मारहाणीत जखमी झालेल्या राणी संजय डवरी, विद्या विष्णू कोटी, मेघा घन:श्याम दिर्डीकर व विनोद पवार (चौघे रा. खोतनगर, पवनचक्कीजवळ, मिरज) यांच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
खोतनगरमधील पवनचक्कीजवळ नातेवाईकांचे लग्न असल्याने या महिला व विनोद पवार गेले होते. लग्नापूर्वी जेवणाचा कार्यक्रम होता. नंतर अक्षतांची वेळ झाल्याने जेवण वाढायचे बंद केले होते. त्यावेळी संशयित तिथे गेले. ‘जेवण का बंद केले आहे?’, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावेळी विनोद पवार याने, अक्षतांची वेळ झाल्याने जेवण बंद ठेवले आहे. अक्षता संपल्यानंतर जेवण वाढायला सुरुवात केली जाणार आहे, तोपर्यंत थांबा, असे सांगितले. पण संशयितांनी, आम्हाला आताच जेवण पाहिजे, असा पवित्रा घेतला. यातून त्यांनी विनोद पवारशी वाद घातला. त्यानंतर ते तेथून निघून गेले. सायंकाळी सहा वाजता संशयितांनी विनोद पवार यास गाठून ‘तू आम्हाला दुपारी जेवायला का वाढले नाहीस?’, असा जाब विचारला. तसेच शिवीगाळ करुन त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी संबंधित महिला त्याला सोडविण्यास गेल्यानंतर संशयितांनी त्यांनाही काठीने मारहाण केली. याप्रकरणी रात्री उशिरा संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
अजून अटक नाही
जखमी महिलांपैकी राणी डवरी यांनी फिर्याद दाखल केली. त्यांचे मूळ गाव घोटवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) आहे. लग्नासाठी त्या आल्या होत्या. सहाजणांनी खोतनगरमध्ये घुसून तीन महिलांसह इतरांना मारहाण करुन २४ तास होऊन गेले तरी, मिरज पोलिसांनी अजूनही एकाही संशयिताला अटक केलेली नाही.