उमदी पोलिस ठाण्यात संशयिताची आत्महत्या
By admin | Published: June 8, 2016 12:37 AM2016-06-08T00:37:43+5:302016-06-08T00:42:23+5:30
गूढ वाढले : पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोप; महिन्यातील दुसरी घटना
उमदी : गुलगुंजनाळ (ता. जत) येथे गंगुबाई अमगोंड नंदगोंड या महिलेच्या खूनप्रकरणी संशयित म्हणून उमदी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राजकुमार गुंडाप्पा नंदगोंड
(वय २८) याने उमदी पोलिस ठाण्याच्या शौचालयात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मात्र, राजकुमारच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकुमार याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.
आठवडाभरापूर्वी गुलगुंजनाळ येथील वनविभागाच्या हद्दीत गंगुबाई नंदगोंड
(वय २८) या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या खुनाचा तपास उमदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्याकडे आहे. वाघमोडे यांनी संशयित म्हणून गंगुबाईचा दीर राजकुमार नंदगोंड व सासरे गुंडाप्पा नंदगोंड या दोघांना घुमकनाळ (ता. इंडी) येथून शनिवारी ताब्यात घेतले व उमदी पोलिस ठाण्यात आणून ठेवले. चौकशीनंतर रविवारी गुंडाप्पा नंदगोंड यांना सोडून दिले, मात्र त्यांचा मुलगा राजकुमार याला चौकीत ठेवून घेतले होते. गंगुबाई हिचा खून होण्याअगोदर राजकुमारच्या मोबाईलवर तिने अनेकदा संपर्क केला होता, अशी माहिती पुढे आल्याने पोलिसांनी राजकुमारची चौकशी सुरू केली होती.
सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान राजकुमारने उमदी पोलिस ठाण्यातील शौचालयात रूमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी मंगळवारी पहाटे त्याच्या नातेवाईकांना कळवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी उमदी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली. राजकुमारने आत्महत्या केली नसून, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पहाटे चार वाजता पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेला पाठविण्यात आला.
राजकुमारने आत्महत्या केलेल्या शौचालयाची उंची कमी आहे. तेथे रुमालने गळफास घेऊन आत्महत्या करण्याइतपत जागाही नाही. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)
एकाच महिन्यातील दुसरी घटना
काही दिवसांपूर्वी उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संख पोलिस चौकीत युनूस अपराध या संशयिताने आत्महत्या केली होती. त्याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच दुसरी घटना घडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
गौडबंगाल
खून झाल्यानंतर सुरुवातीला गंगुबाई नंदगोंड हिची ओळख पटली नव्हती. मात्र नंतर ओळख पटल्यानंतर ती महिला कोण, कुठली, याची साधी नोंदही पोलिसांच्या स्टेशन डायरीत नाही. त्यामुळे यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिसांच्या मारहाणीत राजकुमारचा मृत्यू : गुंडाप्पा नंदगोंड यांचा आरोप
शनिवारी पोलिसांनी राजकुमार याला सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास अटक केली. त्याच्यासोबत मलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र रविवारी मला सोडून राजकुमार याला चौकशीसाठी ठेवून घेतले, पण मी तिथेच थांबून होतो. राजकुमार याला पोलिसांनी मारहाण केल्याचा, त्याच्या ओरडण्याचा आवाज बाहेर येत होता. ‘चौकशी करा, पण मारू नका’, अशी विनंती पोलिसांना केली. परंतु त्यांनी मारहाण चालूच ठेवली. त्यामुळे राजकुमारचा मृत्यू झाला, असा आरोप गुंडाप्पा नंदगोंड यांनी केला आहे.
पोलिस अधिकाऱ्याची सीआयडी चौकशी सुरू
या आत्महत्येप्रकरणी उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांची सीआयडीचे उपअधीक्षक पन्हाळकर यांनी अडीच तास बंद खोलीत चौकशी केली. पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरीही ताब्यात घेण्यात आली आहे. सीआयडी विभागाकडून गंगुबाई हिच्या खुनाच्या घटनास्थळाची पाहणी करण्यात आल्याचे समजते.
पोलिस अधिकारी व
कर्मचारी गोंधळात
राजकुमार नंदगोंड याच्या आत्महत्येमुळे पोलिस अधिकारी गोंधळले होते. पत्रकारांनी राजकुमार नंदगोंड याला ताब्यात घेताना कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला होता का, असा प्रश्न विचारला असता वाघमोडे यांनी, ‘नाही’ असे स्पष्ट सांगितले.
मात्र, एका पोलिस कर्मचाऱ्याने कर्नाटक पोलिसांना सूचना दिल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून आले.