सांगलीतील शिराळा येथे वन रक्षकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट
By अविनाश कोळी | Published: August 16, 2023 03:45 PM2023-08-16T15:45:19+5:302023-08-16T16:05:15+5:30
प्रमोद वडिलांच्या जागी अनुकंपाखाली भरती झाले होते
शिराळा : येथील श्रीराम कॉलनीमध्ये राहणारे चांदोलीतील वनरक्षक प्रमोद पांडुरंग कोळी (वय ३४, मूळ गाव बोरपाडळे, ता. पन्हाळा) यांनी बेडरूममध्ये पंख्याला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा विवाह पाच महिन्यांपूर्वी झाला होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ही घटना सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली.
याबाबत घर मालक दयानंद घोडके (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद कोळी हे चांदोलीत झोळंबी या ठिकाणी गेले दोन वर्षांपासून वनरक्षक म्हणून नोकरीस होते. श्रीराम कॉलनीत पाच महिन्यांपासून पत्नीसह राहत होते. सोमवारी रात्री आठनंतर ते बेडरूममध्ये काम करीत बसले होते. त्यांची पत्नी प्रणाली बाजूच्या खोलीत झोपल्या होत्या.
मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रणाली या प्रमोद यांना उठवण्यासाठी गेल्या. बेडरूमच्या दरवाजाला आतून कडी होती. बराच वेळ आवाज देऊन कडी काढली नाही. त्यामुळे घरमालक घोडके यांना माहिती दिली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा फोडून काढला असता, आतमध्ये प्रमाेद यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. हवालदार भाऊसाहेब कुंभार तपास करीत आहेत.
प्रमोद यांच्या वडिलांचे निधन झाले असून, ते अनुकंपाखाली भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.