नेर्ले येथे जवानाच्या पत्नीची दोन मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:49 PM2019-04-18T23:49:23+5:302019-04-18T23:49:29+5:30

मलकापूर : नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वाती महेश ...

Suicide by shooting Jawani's wife with two kids in Nerley | नेर्ले येथे जवानाच्या पत्नीची दोन मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या

नेर्ले येथे जवानाच्या पत्नीची दोन मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या

Next

मलकापूर : नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वाती महेश पाटील (वय २८), विभावरी महेश पाटील (४), देवांश महेश पाटील (१) अशी या दुर्दैवी माय-लेकरांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. आत्महत्येचा हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजता घडला.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील शिवाजी बापू पाटील हे पत्नी नंदा, सून स्वाती, नात विभावरी, नातू देवांशसह ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बंगल्यात एकत्र राहतात. त्यांचा मुलगा व स्वातीचा पती महेश सन २००८ मध्ये सैन्यात भरती झाला असून सध्या तो जैसलमेर (राजस्थान) येथे सेवेत आहे. भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे स्वातीचे माहेर असून तिचे वडील कृष्णा धुमाळ हे व्यवसायानिमित्त सध्या पत्नीसह मुंबईत राहतात. सन २०१३ मध्ये स्वातीचा महेशशी विवाह झाला. सव्वा वर्षांपूर्वी दुसऱ्या मुलाच्या प्रसूतीसाठी स्वाती गावी आली होती. चार वर्षांची मुलगी विभावरी कोकरूड येथील नर्सरी स्कूलमध्ये शिकत होती, तर लहान देवांश नुकताच एक वर्षाचा झाला होता.
दरम्यान, शिवाजी पाटील यांच्या घरातील किचनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. गुरुवारी सकाळी सासू नंदा या साफसफाई उरकून दोन्ही नातवंडांसह शेजारीच असलेल्या नातलगांकडे गेल्या तर सासरे गावातील साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले. दरम्यान, सासू नंदा यांच्याकडे येऊन स्वातीने खाऊ भरविण्याच्या निमित्ताने दोन्ही मुलांना घरी नेले. साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून सासरे शिवाजी परतल्यानंतर बंगल्याबाहेर झाडाच्या कट्ट्यावर येऊन बसले असता त्यांना काहीतरी जळाल्याचा वास आला. खिडकीतून धूर येऊ लागल्याने घरात शॉर्टसर्किट झाले का म्हणून त्यांनी पत्नीला पाहण्यास सांगितले. यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता. घरी आलेली मुले व सून दिसत नसल्याने व शंका आल्यामुळे सासूने आरडाओरडा सुरू केला. जमलेल्या नागरिकांनी खोलीचा दरवाजा तोडून आत पाहिले तर स्वातीसह दोन्हीही लहान मुले भाजून निपचित पडली होती. यावेळी स्वाती व विभावरी दोघीही गतप्राण झाल्या होत्या तर लहान देवांशची किंचित हालचाल जाणवल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले परंतु वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचे छायाचित्रण केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. खबरदारीचा उपाय म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी स्ट्रायकिंग फोर्सला घटनास्थळी पाचारण केले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत घटनेची नोंद झाली नव्हती.

Web Title: Suicide by shooting Jawani's wife with two kids in Nerley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.