इस्लामपुरात गोळी झाडून आत्महत्येचा वकिलाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:05 AM2017-10-26T00:05:42+5:302017-10-26T00:08:45+5:30

Suicide Suit Attempt By Taking Isle Of Islampur | इस्लामपुरात गोळी झाडून आत्महत्येचा वकिलाचा प्रयत्न

इस्लामपुरात गोळी झाडून आत्महत्येचा वकिलाचा प्रयत्न

Next

इस्लामपूर : येथील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात वकिलाने स्वत:च्या डोक्यात गावठी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेचे नेमके कारण रात्रीपर्यंत निष्पन्न झाले नव्हते. जखमीवर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढण्यात आली आहे. मात्र, रक्तस्राव थांबला नसल्याचे जखमीच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
संग्राम धोंडिराम पाटील (वय ३३, रा. कापूसखेड, ता. वाळवा) असे या वकिलाचे नाव आहे. येथील पालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावर संग्राम पाटील आणि वकील मित्र संदीप भीमराव पाटील (रा. इस्लामपूर) अशा दोघांचे संयुक्त कार्यालय आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संग्राम पाटील सकाळी आठच्या सुमारास कार्यालयात आले होते. त्यानंतर दहाच्या सुमारास संदीप पाटील आले. त्यावेळी कार्यालयाचा दरवाजा आतून कडी लावल्याने बंद होता. त्यांनी संग्राम यांना अनेक हाका मारल्या; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळतनसल्याने त्यांनी आजूबाजूला असणाºया वकील मित्रांना मदतीसाठी बोलावले. अमोल पाटील, नंदकुमार पाटील, विजय कार्इंगडे तेथे आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अ‍ॅड. कार्इंगडे यांनी संग्राम पाटील यांच्या दोघा निकटवर्तीयांना बोलावून घेतले. त्या सर्वांनी जोरात धक्का दिल्यावर दरवाजा उघडला. सर्वांनी आत जाऊन पाहिले असता अ‍ॅड. संग्राम पाटील खुर्चीवरून खाली पालथ्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडले होते.
या सर्वांनी प्रसंगावधान राखून अ‍ॅड. पाटील यांना तातडीने वाहनातून शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी तेथे तातडीची शस्त्रक्रिया करून उजव्या कानाच्या वरच्या बाजूस डोक्यात असणारी बंदुकीची गोळी काढण्यात आली, परंतु रक्तस्राव थांबला नव्हता. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी काहींचे जाबजबाब नोंदवून कार्यालयातील पिस्तूल व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल शिंदे अधिक तपास करीत आहेत.
अफवांना ऊत
ग्रामपंचायत निवडणुकीवेळी कापूसखेड येथे राष्ट्रवादी समर्थकांच्या दोन गटांत लढत झाली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली होती. शिवाय अ‍ॅड. संग्राम पाटील यांचे आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा होती. त्यातून त्यांच्यावर हल्ला झाला असावा, अशी अफवा पसरली होती.
मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती आणि अ‍ॅड. पाटील यांना उपचारासाठी घेऊन जाणाºया त्यांच्या मित्रांकडून माहिती घेत हा आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या घटनेपाठीमागील निश्चित कारण आणि पिस्तूल याबाबत जखमीचा जबाब अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिल्याशिवाय समजू शकणार नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
डायरीवर ‘सॉरी’
अ‍ॅड. संग्राम पाटील यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेण्यापूर्वी टेबलवर असलेल्या वकील डायरीच्या पहिल्या पानावर ‘सॉरी’ असा शब्द इंग्रजीमध्ये लिहिला होता. टेबलवरच त्यांचा मोबाईल पडला होता, तर गोळी झाडून घेतल्यानंतर ते खुर्चीमधून खाली कोसळून पालथ्या अवस्थेत पडले होते. त्यांच्या खुर्चीवर आणि खाली रक्त सांडले होते.

Web Title: Suicide Suit Attempt By Taking Isle Of Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.