जतमध्ये विवाहितेची मुलासह विहिरीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:53 PM2018-04-01T23:53:30+5:302018-04-01T23:53:30+5:30
जत : तालुक्यातील अमृतवाडी येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने आपला मुलगा अशिष (४ वर्षे) याला पोटाशी बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. कौटुंबिक वादातून या विवाहितेने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.
याप्रकरणी मृत प्रियांकाचा पती रामचंद्र सुखदेव बाबर यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. रामचंद्र व प्रियांका यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला. प्रियांका यांचे माहेर देसारहट्टी (ता. अथणी) येथील आहे. लग्नानंतर त्यांना ऐश्वर्या (७ वर्षे) व अशिष ही दोन मुले झाली. शनिवारी प्रियांका व रामचंद्र यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात मुलगा अशिष याला घेऊन ती घराबाहेर पडली होती. त्यानंतर काही अंतरावर कृष्णा बाबर यांच्या विहिरीजवळ येऊन, अशिष याला पोटाशी बांधून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पाण्याचा उपसा करुन मृतदेह काढले
प्रियांका घरातून बेपत्ता झाल्यानंतर पती रामचंद्र, सासरा सुखदेव व सासू अंबूबाई हे दोघांचा सर्वत्र शोध घेत होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान त्यांना विहिरीच्या काठावर प्रियांकाचे चप्पल दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती त्यांनी जत पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार व सहकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ही विहीर ८० फूट खोल असून विहिरीत सुमारे २७ फूट पाणी आहे. विहिरीला पायºया नाहीत. गावात भारनियमन असल्यामुळे वीज पुरवठा बंद होता. रात्री उशिरा वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर दोन विद्युत मोटारींद्वारे विहिरीतील पाणी रात्रभर उपसण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
प्रियांकाचे पती रामचंद्र हे शेतकरी आहेत. अमृतवाडी गावापासून पूर्व बाजूस सुमारे एक किलोमीटर अंतरावर बाबर वस्ती परिसरात त्यांची शेतजमीन आहे. शेतातच घर बांधून सासू, सासरा, पती व मुले सर्वजण एकत्रितपणे राहतात. मोठी मुलगी ऐश्वर्या सांगली येथील रामचंद्र यांच्या बहिणीकडे असते.