नागठाणेत कर्जास कंटाळून शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 03:44 PM2019-04-17T15:44:47+5:302019-04-17T15:45:06+5:30
नागठाणे (ता. पलूस) येथील शेतकरी भिकाजी ऊर्फ जगदीश संपत शेळके (वय ४२) यांनी कर्जास कंटाळून नागठाणे-आष्टा मार्गावरील कोंडार मळा भागातील शेतात जनावरांच्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
वाळवा : नागठाणे (ता. पलूस) येथील शेतकरी भिकाजी ऊर्फ जगदीश संपत शेळके (वय ४२) यांनी कर्जास कंटाळून नागठाणे-आष्टा मार्गावरील कोंडार मळा भागातील शेतात जनावरांच्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी एक वाजता हा प्रकार उघडकीस आला.
भिकाजी शेळके हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांची नागठाणे येथे अडीच एकर शेतजमीन आहे. त्यांनी नागठाणे विकास सोसायटी व राष्ट्रीयकृत बँकेकडून साडतीन लाखाचे कर्ज घेतले होते. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र या कर्जमाफीचा लाभ शेळके यांना मिळाला नव्हता. परिणामी सहा टक्क्याऐवजी बारा टक्के व्याजदराने कर्ज भरण्याची वेळ त्यांच्यावर आली. शिवाय कर्ज थकल्यामुळे मध्यम मुदतीचे कर्ज मिळत नव्हते. सोसायट्या आणि बँकांनी त्यांना कर्ज देण्यास नकार दिला होता.
गेल्या काही दिवसांपासून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सोसायटीचा तगादा सुरू झाला होता. मात्र कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत भिकाजी शेळके होते. आर्थिक ओढाताणीमुळे ते त्रस्त होते. या कर्जाला आणि वसुलीच्या तगाद्याला कंटाळूनच मंगळवारी दुपारी त्यांनी शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
शेळके यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी त्यांचे चुलत बंधू सचिन शेळके यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक पंकज मंडले व सुप्रिल मोकाशी अधिक तपास करत आहेत.