डोंगरसोनीत शेतकऱ्याची कर्जास कंटाळून आत्महत्या
By admin | Published: April 20, 2017 12:03 AM2017-04-20T00:03:22+5:302017-04-20T00:03:22+5:30
डोंगरसोनीत शेतकऱ्याची कर्जास कंटाळून आत्महत्या
तासगाव : डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील शिवराम कृष्णा झांबरे (वय ६४) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. सततचा दुष्काळ व नापिकीला ते कंटाळले होते. त्यातच बॅँक, सोसायटीचे साडेतील लाखांचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला. याबाबत तासगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.
शिवराम झांबरे हे डोंगरसोनी येथे मुलगा संपत व कुटुंबीयांबरोबर शेती करतात. त्यांची एक एकर द्राक्षबाग आहे. गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे त्यांना गेल्यावर्षी दोनवेळा द्राक्ष छाटणी घ्यावी लागली. दुष्काळामुळे त्यांनी टॅँकरने पाणी घालून जिद्दीने द्राक्षबाग जोपासली होती.
यंदाही पाण्याची टंचाई, त्यात गतवर्षीचे नुकसान यामुळे झांबरे हे वैफल्यग्रस्त होते. त्यातच बॅँक, सोसायटीचे असलेले साडेतीन लाखांचे कर्ज कसे फेडायचे, याची काळजी त्यांना सतावत होती. या तणावातच त्यांनी बुधवारी सकाळी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद नव्हती. (वार्ताहर)