चिमुरडीसह मातेची विहिरीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 01:22 AM2016-02-25T01:22:09+5:302016-02-25T01:22:09+5:30
जत तालुक्यातील अंतराळ येथील घटना
जत : तालुक्यातील अंतराळ येथील रेणुका ऊर्फ अर्चना राहुल बुरुटे (वय १९) यांनी स्वत:च्या प्रांजली (१० महिने) या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी बाळासाहेब शंकर बुरुटे (रा. शेगाव, ता. जत) यांनी जत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
रेणुका व राहुल बुरुटे यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला. रेणुका यांचे माहेर रेड्डे (ता. मंगळवेढा) आहे. त्यांना दहा महिन्यांची एक मुलगी असून, राहुल शेतमजूर आहेत. अंतराळपासून सुमारे दोन किलोमीटरवर आवंढी रस्त्यावरील बुरुटे मळ्यात रेणुका, पती राहुल, सासू विमल, सासरा मारुती, नणंद वैशाली, दीर विनोद व जाऊ असे एकत्रित आठजणांचे कुटुंब राहते.
रेणुका व राहुल या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून सतत वाद-विवाद होत असल्यामुळे रेणुका यांचे वडील यशवंत मारुती कांबळे रविवारी अंतराळ येथे आले होते. दोघांना समजावून सांगून ते सोमवारी निघून गेले होते. रेणुका राहत असलेल्या घरापासून जवळच शिवाजी गेनू बुरुटे यांची विहीर आहे. रेणुका बुधवारी सकाळी मुलीसह घरातील कोणालाही न सांगता विहिरीवर गेल्या. तेथून त्यांनी पती राहुल यांना दूरध्वनी करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. वडिलांनाही दूरध्वनी करून लवकर येण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी चप्पल विहिरीच्या काठावर सोडून त्यावर मोबाईल ठेवला. डोक्याला बांधलेला स्कार्फ सोडून त्यांनी प्रांजलीला त्याच स्कार्फने स्वत:च्या पोटाला बांधून घेऊन विहिरीत उडी मारली. राहुल डेअरीत दूध घालण्यासाठी शेगाव येथे गेले होते. दूरध्वनी आल्यानंतर ते तत्काळ विहिरीकडे धावले. तेथील नागरिकांना बोलावून घेऊन त्यांनी रेणुका व प्रांजली यांना बाहेर काढले; पण त्यापूर्वीच दोघी मायलेकींचा मृत्यू झाला होता.दरम्यान, रेणुका यांनी आत्महत्या केली नसून, सासू, सासरा, दीर, पती, जाऊ व नणंद यांनी संगनमताने खून करून त्यांना विहिरीत ढकलून दिले आहे. सासरकडून सतत मारहाण करून तिचा पैशासाठी मानसिक छळ केला जात होता, अशी तक्रार रेणुका यांचे वडील यशवंत कांबळे व आई रुक्मिणी कांबळे यांनी जत पोलिसांत केली आहे; परंतु या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पुढील तपास पोलीस हवालदार किरण कांबळे व दिग्विजय कराळे करीत आहेत. (वार्ताहर)