पोलिसांच्या मारहाणीमुळे महिलेची आत्महत्या
By admin | Published: September 5, 2016 12:16 AM2016-09-05T00:16:55+5:302016-09-05T00:16:55+5:30
नातेवाइकांचा आरोप : खूनप्रकरणी घेतले होते चौकशीसाठी ताब्यात; जतमधील घटना
जत : ट्रॅक्टर चालकाच्या खूनप्रकरणी तब्बल दोनवेळा पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केल्याने सावित्री शिवाजी गडदे (वय २८, रा. तंगडी मळा, जत) या महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांच्या मारहाणीला घाबरून तिने हे कृत्य केल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी केली आहे. जत पोलिसांच्या चौकशीनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही सावित्री यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, अशी चर्चा सुरू आहे.
सावित्री गडदे यांचे दीर प्रवीण गडदे यांनी जत पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जतच्या तंगडी मळ्यातील ट्रॅक्टरचालक विलास अण्णाप्पा चव्हाण (४५) यांचा ३० आॅगस्टला रात्री दहा वाजता खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी जत पोलिसांनी ३ सप्टेंबरला सावित्री गडदे यांना सायंकाळी पाच वाजता चौकशीसाठी बोलावून घेतले होते. सावित्री या सासूला सोबत घेऊन पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. पोलिसांनी सासूला बाहेर बसण्यास सांगितले व सावित्री यांची चौकशी केली. यादरम्यान त्यांना शारीरिक (पान १ वरून) व मानसिक त्रास दिला. त्यांना पोलिस गाडीतून शासकीय विश्रामगृहाजवळ पांढरा बंगला येथे नेऊन बेदम मारहाण केली. याचा सावित्री यांना मानसिक धक्का बसला. तसेच मारहाणीला घाबरून त्यांनी रविवारी दुपारी १ च्या सुमारास राहत्या घरी पेटवून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागामार्फत चौकशी करावी.
सावित्री गडदे यांचे सोन्याळ हे माहेर, तर बाज (ता. जत) हे सासर आहे. त्या पती, दोन मुले, सासू व सासरा यांच्यासमवेत जतच्या तंगडी मळ्यात राहत होत्या. तिथे त्यांनी शेतजमीन विकत घेतली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून हे कुटुंब तंगडी मळ्यात वास्तव्यास आहे. सावित्री यांचे पती शिवाजी हे शनिवारी रात्री घरगुती कामासाठी मुंबईला गेले होते. रविवारी दुपारी त्यांच्या घरी कोणीच नव्हते. त्यावेळी त्यांनी पेटवून घेतले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. (वार्ताहर)
उमदीनंतर जत पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
तीन महिन्यांपूर्वी उमदीला एका महिलेचा खून झाला होता. या खूनप्रकरणी उमदी पोलिसांनी चंद्रशेखर नंदगोड या कर्नाटकातील संशयितास ताब्यात घेतले. त्याला तीन दिवस डांबून ठेवून मारहाण केली होती. या मारहाणीला घाबरुन नंदगोड याने पोलिस ठाण्यातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. या प्रकरणाचा सीआयडीकडून अजून तपास पूर्ण झालेला नसतानाच, जतमध्ये खूनप्रकरणीच चौकशीला ताब्यात घेतलेल्या सावित्री गडदे या महिलेनेही पोलिसांच्या मारहाणीला घाबरुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
रुग्णालयात तणाव
सावित्री गडदे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, त्यावेळी नातेवाइकांनी मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांत या घटनेची नोंद नव्हती. गडदे यांंचा भाजून मृत्यू झाल्याची नोंद होती.