ग्रामपंचायत निवडणुकीत तासगाव तालुक्यात संजयकाका विरुद्ध सुमनताई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:33+5:302020-12-23T04:23:33+5:30
जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींपैकी १५२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष ग्रामपंचायतींवर आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत ...
जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींपैकी १५२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष ग्रामपंचायतींवर आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य आणि राष्ट्रीय समाज पक्ष छुप्या पध्दतीने आपली शक्ती ग्रामपंचायत निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. छोटे-मोठे पक्ष आणि संघटना निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे चित्र दिसत असले, तरी तासगाव तालुक्यात सर्वाधिक ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ठिकाणी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द भाजप अशीच लढत होणार आहे. या ठिकाणी खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील गटाची कसोटी लागणार आहे.
जत तालुक्यातील बहुतांशी लढती या काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत विरुध्द भाजपचे माजी आ. विलासराव जगताप गटात होणार आहेत. परंतु, राष्ट्रवादी, जनसुराज्य, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना काही ग्रामपंचायतींमध्ये आपले उमेदवार उभा करणार आहेत.
महाविकास आघाडी राज्यात असल्यामुळे ते चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत खानापूर तालुक्यात दिसणार का, हे पाहावे लागणार आहे. येथे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर विरुध्द राष्ट्रवादीचे नेते माजी आ. सदाशिवराव पाटील गटात लक्षवेधी लढती होण्याची शक्यता आहे.
मिरज तालुक्यातील २० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असून, सर्व मोठ्या ग्रामपंचायती आहेत. काँग्रेसचे वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील विरुध्द भाजपचे आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ गटात लढती होणार आहेत. राष्ट्रवादीचे काही ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे.
चौकट
आमने-सामने
- विलासराव जगताप विरूद्ध विक्रम सावंत
- अनिल बाबर विरूध्द सदाशिवराव पाटील
-सुमनताई पाटील विरूध्द संजय पाटील
- विश्वजित कदम विरूद्ध संग्रामसिंह देशमुख
- राजेंद्रअण्णा देशमुख विरूद्ध तानाजी पाटील
- विशाल पाटील विरूद्ध सुधीर गाडगीळ
चौकट
लक्षवेधी निवडणुका
मिरज तालुक्यातील मालगाव, कवलापूर, माधवनगर, कवठेपिरान, तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, पेड, येळावी, बोरगाव, सावळज, पलूस तालुक्यातील भिलवडी या ठिकाणच्या निवडणुका लक्षवेधी होणार आहेत.