सांगलीतील कुंडलच्या कुस्ती मैदानात सुमित मलिकची बाजी, देव थापाची चटकदार लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 12:48 PM2023-01-30T12:48:36+5:302023-01-30T12:49:17+5:30

मैदानाचे मुख्य आकर्षण असणारी देवा थापा विरुद्ध नवीन जम्मू हिमाचल केसरी यांची चटकदार लढत कुस्तीशाैकीनांची दाद

Sumit Malik wins at Kundal's wrestling ground in Sangli | सांगलीतील कुंडलच्या कुस्ती मैदानात सुमित मलिकची बाजी, देव थापाची चटकदार लढत

सांगलीतील कुंडलच्या कुस्ती मैदानात सुमित मलिकची बाजी, देव थापाची चटकदार लढत

Next

कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथील ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात हिंदकेसरी सुमित मलिक विरुद्ध हिंदकेसरी अमित बनिया यांच्या प्रथम क्रमांकाच्या लढतीत सुमित मलिक गुणांवर विजयी झाला. मैदानाचे मुख्य आकर्षण असणारी देवा थापा विरुद्ध नवीन जम्मू हिमाचल केसरी यांची चटकदार लढत कुस्तीशाैकीनांची दाद मिळवून गेली.

कुंडल येथे अनंत चतुर्दशीनंतरच्या रविवारी होणारे हे लाल मातीतील मैदान नैसर्गिक आपत्तीमुळे यंदापासून गणेश जयंतीनंतरच्या रविवारी आयाेजित करण्यात येत आहे. प्रारंभी क्रांती समूहाचे प्रमुख आमदार अरुण लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, बाळासाहेब पवार, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले.

पहिल्या क्रमांकाची कुस्ती हिंदकेसरी सुमित मलिक विरुद्ध हिंदकेसरी अमित बनिया यांच्यामध्ये रंगली. पाचव्या मिनिटाला सुमित मलिकेने एकेरी पट काढला आणि कुस्तीशौकिनांच्या काळजाचा ठोका चुकला. पुन्हा एकमेकांच्या डावांचा अंदाज घेत दाेघेही एकमेकांवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करीत हाेते. पुन्हा आठव्या मिनिटाला सुमित मलिकने कब्जा घेतला. पुन्हा एकमेकांचा अंदाज घेत असताना चाैदाव्या मिनिटाला दोन्ही मल्लांना पंचांनी पाच मिनिटांची वेळ दिली, तरीही निकाली न झाल्याने पुन्हा दोघांना समज देऊन ही कुस्ती गुणांवर लावण्यात आली. यामध्ये सुमित विजयी झाला.

ही कुस्ती क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सर्व स्वातंत्र्य सेनानींच्या स्मरणार्थ आमदार अरुण लाड आणि कुटुंबीयांनी पुरस्कृत केली हाेती. पंच म्हणून आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे गोविंद पवार यांनी काम पाहिले.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र कुमार व हिंदकेसरी मोनू खुराणा यांच्यात झाली. पाचव्या मिनिटाला महेंद्र कुमारने एकेरी पट काढला; पण ताे निसटला. पुन्हा महेंद्र कुमारने पोकळ घिस्सा डावावर सातव्या मिनिटाला कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ही कुस्ती क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड साखर कारखाना कर्मचाऱ्यांतर्फे आमदार अरुण लाड यांनी लावली होती. पंच म्हणून हणमंत जाधव यांनी काम पाहिले.

तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती हिंदकेसरी प्रवीण कोहली विरुद्ध नॅशनल चॅम्पियन माऊली कोकाटे यांच्यात झाली. यामध्ये माऊली गुणांवर विजयी झाला. ही कुस्ती महेंद्र लाड आणि हैबती लाड यांनी पुरस्कृत केली हाेती. पंच म्हणून विकास पाटील यांनी काम पाहिले.

चौथ्या क्रमांकाची कुस्ती माऊली जमदाडे (गंगावेश तालीम कोल्हापूर) विरुद्ध कल्लू बडवाल (दिल्ली) यांच्यात झाली. माऊलीने पोकळ घिस्सा डावावर तिसऱ्या मिनिटाला कल्लूला अस्मान दाखवले, पण हा विजय ग्राह्य नसल्याचे प्रेक्षकांनी सांगितल्याने प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ही कुस्ती पुन्हा लावण्यात आली. यामध्ये माऊली बॅक थ्राे डावावर पुन्हा विजयी झाला. ही कुस्ती कॅप्टन रामचंद्र लाड यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत करण्यात आली होती.

नामदेव केसरे (वारणा) विरुद्ध सागर पवार (सांगली) यांच्या लढतीत नामदेव केसरेने पाचव्या मिनिटाला दुहेरी पट काढून सागर पवारला अस्मान दाखवले आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. संदीप मोटे विरुद्ध प्रकाश नरुटे यांच्या लढतीत पोकळ घिस्सा डावावर संदीप मोटे विजयी झाला. या कुस्तीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ओंकार मदने (क्रांती) विरुद्ध अनिल ब्राह्मणे (पुणे) यांच्या कुस्तीत ओंकार मदने एकचाक डावावर तिसऱ्या मिनिटाला विजयी झाला.

महारुद्र काळे विरुद्ध लवप्रित यांच्यात किर्लोस्कर कंपनीने पुरस्कृत केलेल्या लढतीत महारुद्र काळे घुटना डावावर विजयी झाला. या कुस्तीचे पंच म्हणून सुनील मोहिते यांनी काम पाहिले.
उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर (कोल्हापूर) विरुद्ध रवी वेहरा (पंजाब) यांची कुस्ती बराच वेळ चालल्याने गुणांवर कुस्ती लावण्यात आली. त्यामध्ये प्रकाश बनकर विजयी झाला. महाराष्ट्र केसरी बाला रफिक (हनुमान आखाडा) विरुद्ध मोनू दहिया (हरियाणा) यांच्या कुस्तीत घिस्सा डावावर बाला रफिक विजयी झाला.

याशिवाय मैदानात शंभरहून अधिक लहान-मोठ्या लढती झाल्या. यामध्ये सिद्धार्थ अष्टेकर, इंद्रजित शेळके, तुषार शिंदे, रोहित तामखडे, विजय करांडे, तेजस पाटील, अविराज चव्हाण, आर्यन भोगे, रणजित पाटोळे, हृषिकेश सावंत (सांगली), जय कदम (कोरेगाव), उदय लोंढे (सांगली), आकाश जाधव, स्वराज काशीद, शंतनू शिंदे (बेनापूर), अनिकेत चव्हाण, दशरथ तामखडे, शब्बीर शेख, नाथा पवार (बेनापूर), सयाजी जाधव, शंभूराजे पाटील (बोरगाव), अनिकेत गावडे, अमोल नवले, भारत पवार, गौरव हजारे,

अंकुश माने (क्रांती तालीम), विश्वजित रूपनर, मंगेश माने (रहिमतपूर), प्रथमेश गुरव (वारणा), शशिकांत गावडे (क्रांती), समीर शेख (पुणे), रोहन रंडे (मुरगूड), अक्षय मदने (कडेगाव) यांनी प्रतिस्पर्धी मल्लांवर विजय मिळविला.

पंच म्हणून राजेंद्र लाड, सर्जेराव पवार, शिवभूषण जंगम, उत्तम पवार, विष्णुपंत लाड, वसंत लाड, हैबतराव लाड यांनी काम पाहिले.

मैदानाला भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, हिंदकेसरी दीनानाथ सिंग, विराज शिंदे, बाबा महाडिक, चंद्रहार पाटील, हिंदकेसरी विकास जाधव, संदीप रास्कर, हिंदकेसरी संतोष वेताळ, संपत चिंचोलीकर यांनी भेट दिली. समालोचन शंकर पुजारी, ईश्वरा पाटील, जोतिराम वाजे यांनी केले.

निकाली कुस्तीचा आग्रह

निखिल माने (सांगली) विरुद्ध आर्यन जाधव (सोहोलो) या लहानांच्या कुस्तीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. बऱ्याच वेळाने ही कुस्ती सोडवण्यात आली; पण आर्यन जाधवने मैदान सोडण्यास नकार दिला आणि निकाली कुस्तीसाठी खुद्द पैलवानाने आग्रह धरला आणि शेवटी गुणांवर आर्यन जाधवने विजय मिळवून शौकिनांची वाहवा मिळवली.

देव थापाची चटकदार लढत

मैदानाचे मुख्य आकर्षण असणारी देवा थापा विरुद्ध नवीन जम्मू हिमाचल केसरी यांची कुस्ती चांगलीच रंगली. दुसऱ्या मिनिटाला थापाने धोबीपछाड लावली आणि प्रेक्षकांकडून ‘बजरंग बली की जय’ असा जयघोष सुरू झाला. अकरा मिनिटांच्या खेळानंतर पंचांनी कुस्तीला दोन मिनिटांची वेळ दिली आणि १२ मिनिटे २५ सेकंदांनी या कुस्तीत देवा थापा विजयी झाला.

वसंत पाटील (अंतरीकर) यांना पुरस्कार

यंदाचा क्रांतिवीर शामराव बापू लाड स्मृती पुरस्कार वसंत पाटील (अंतरीकर) यांना मैदानात प्रदान करण्यात आला.

Web Title: Sumit Malik wins at Kundal's wrestling ground in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.