जत तालुक्यात चिंच उत्पादकांना उन्हाळी बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:48+5:302021-02-05T07:17:48+5:30
संख : परतीचा दमदार पाऊस, अनुकूल हवामान व हवेतील आर्द्रता यांमुळे जत तालुक्यात या वर्षी चिंचा मोठ्या प्रमाणात लगडलेल्या ...
संख : परतीचा दमदार पाऊस, अनुकूल हवामान व हवेतील आर्द्रता यांमुळे जत तालुक्यात या वर्षी चिंचा मोठ्या प्रमाणात लगडलेल्या आहेत. चिंचेच्या उत्पादनात वाढ होणार आहे. दर्जानुसार ६० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे चवीने आंबटगोड असणारी चिंच उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन व दराच्या बाबतीत गोड धक्का देणार आहे. उन्हाळी बोनस देतील, अशी आशा उत्पादकांतून होत आहे.
तासगाव बाजारात २०१९ ला ८० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला होता. गेल्या वर्षी चिंच उत्पादकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला होता.
तालुक्यातील शेतीच्या बांधावर, पाटालगत, ओढ्यालगत चिंचेच्या झाडांची संख्या निसर्गातच वाढलेली पाहण्यास मिळते. देवस्थानच्या जागेवर चिंचेची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. शासनाकडून व सामाजिक वनीकरण विभागाकडून रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी चिंचेच्या झाडांनाच प्राधान्य दिले आहे. चिंचेला चांगला दर मिळत असल्याने मागील वर्षापासून प्रयोगशील शेतकरी चिंचेची शेतीही करू लागला आहे.
चिंचेच्या झाडाचे लाकूड मऊ व टिकाऊ असल्यामुळे फर्निचर, शेतीकामाची अवजारे बनविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याला मोठी मागणी आहे. सध्या चिंचेच्या लाकडाला ४२५ रुपये घनफूट भाव मिळत आहे.
चाैकट
चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व
चिंचेच्या १०० ग्राम गरामध्ये पाणी २१ टक्के, शर्करा ६७ टक्के, प्रथिने ३ टक्के, तंतुमय ५.६ टक्के, क जीवनसत्त्व ३ ग्रॅम इतके प्रमाण असते. विविध विकारांमध्ये चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व आहे.
चाैकट
कापड उद्योगात उपयोग
कापड उद्योगात खळ तयार करण्यासाठी चिंचोक्याचा उपयोग केला जातो. चिंचोके खरेदी करून मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव येथील कापड उद्योगात खळ तयार करण्यासाठी पाठविले जातात. बाजारात दोन वर्षांपूर्वी २० ते २५ रुपये किलो अशा विक्रमी भावाने चिंचोक्यांची विक्री झाली होती.
फोटो ओळ : जत तालुक्यात झाडांना चिंचा लगडलेल्या आहेत.
.