मध्य रेल्वेला सांगली स्थानकाचे वावडे का?, उन्हाळी विशेष गाड्यांचा थांबा देतानाही दुजाभाव
By अविनाश कोळी | Published: April 15, 2024 01:46 PM2024-04-15T13:46:20+5:302024-04-15T13:48:18+5:30
सांगली : तिकीट विक्री व उत्पन्नाच्या माध्यमातून एकीकडे सांगली रेल्वे स्थानक नवनवे विक्रम नोंदवित असताना विशेष गाड्यांना थांबा नाकारण्याचा ...
सांगली : तिकीट विक्री व उत्पन्नाच्या माध्यमातून एकीकडे सांगलीरेल्वे स्थानक नवनवे विक्रम नोंदवित असताना विशेष गाड्यांना थांबा नाकारण्याचा विक्रम मध्य रेल्वेकडून नोंदविला जात आहे. सांगलीबाबतचा दुजाभाव अनेकदा स्पष्ट झाला आहे. जवळच्या दोन रेल्वे स्थानकांना महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक ठिकाणी थांबा दिला जात असतानाही सांगलीला मिरजेचे स्थानक जवळ असल्याने थांबा नाकारला जात आहे.
सर्वात कमी तिकीट विक्री असूनही सातारा रेल्वे स्थानकावर उन्हाळी विशेष गाड्यांना सांगलीपेक्षा अधिक थांबे दिले गेले आहेत. त्यामुळे सांगलीतील सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. दहा वर्षांत रेल्वेगाड्यांचा विस्तार होत असताना सांगली स्थानकाच्या वाट्याला फारसे काही आले नाही. सातत्याने प्रवासी संघटनांची मागणी धुडकावून सांगली स्थानकावर थांबा देण्यासाठी रेड सिग्नल दाखविण्यात आला.
सांगलीतून नव्या गाड्या जाणार, पण त्या येथील स्थानकावर थांबणार नाहीत. सांगलीतून दररोज २० हजार लोकांना १५ कि.मी. दूर मिरजेतून रेल्वे पकडण्यासाठी जावे लागते. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सांगली रेल्वे स्टेशनच्या अस्तित्वाचा प्रश्न प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे. देशामध्ये सर्वत्र रेल्वेगाड्यांचे जाळे पसरत आहे.
गेल्या दहा वर्षांत देशातील अनेक छोट्या शहरांतील रेल्वे स्टेशनवरून एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या सुरू होऊ लागल्या आहेत. मात्र, सांगलीबाबत अजूनही विस्ताराची पावले पडताना दिसत नाहीत. देशात गेल्या दहा वर्षांत एक हजाराहून अधिक नवीन रेल्वेगाड्या सुरू केल्या व दोन हजार गाड्यांचा विस्तार केला गेला; पण सांगली जिल्ह्याच्या वाट्याला काय आले, असा सवाल उपस्थित होत आहे.
पहिली एक्स्प्रेस लाभली
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सांगली रेल्वे स्थानकावर गेल्या दहा वर्षांत दोन रेल्वेगाड्यांनाच थांबा मिळाला. तसेच दीड महिन्यापूर्वी रानी चेन्नम्मा ही पहिली एक्स्प्रेस सांगलीला लाभली. त्यासाठी इतक्या वर्षांचा कालावधी जावा लागला.
सांगलीसाठीच वेगळा नियम
महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील अनेक राज्यांत वीस किलोमीटर अंतरातील दोन स्थानकांना थांबे दिले आहेत. तरीही सांगली व मिरज जवळ असल्याने सांगलीला थांबा देता येत नसल्याचे कारण वारंवार पुढे केले जात आहे. सांगलीसाठी हा वेगळा नियम लावण्यात आला आहे.