संडे स्पेशल - शिक्षणातील एव्हरेस्ट डॉ. माणिकराव साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:25 AM2021-03-20T04:25:06+5:302021-03-20T04:25:06+5:30
शिक्षणाची गंगोत्री अखंड वाहती ठेवण्यासाठी गेली चाळीस वर्षे सरस्वतीची सेवा करणारे डॉ. माणिकराव साळुंखे म्हणजे सांगलीचा अभिमानच. पलूस तालुक्यातील ...
शिक्षणाची गंगोत्री अखंड वाहती ठेवण्यासाठी गेली चाळीस वर्षे सरस्वतीची सेवा करणारे डॉ. माणिकराव साळुंखे म्हणजे सांगलीचा अभिमानच. पलूस तालुक्यातील धनगावचे डॉ. साळुंखे यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रवास दिमाखदार आणि अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. शिक्षणाने माणसाचा कायापालट होतो याचे नेमके उदाहरण डॉ. साळुंखे यांनी आपल्या कामगिरीने नव्या पिढीपुढे ठेवले आहे.
१९९५ मध्ये मुंबईत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे जैविक रसायनशास्त्रात प्राध्यापक म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या डॉ. साळुंखे यांनी त्याच विभागाच्या प्रमुख पदापर्यंत मजल मारली. त्यापुढे जाताना या संस्थेचे संचालक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांच्या कारकिर्दीत या संस्थेने विविध संशोधनांसाठी अनेक संस्थांकडून १५ दशलक्ष रुपये अनुदान मिळविण्याची विक्रमी कामगिरी केली.
२००४ ते २००९ दरम्यान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून नियुक्ती झाली. २००९ मध्ये राजस्थानच्या केंद्रीय विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून सूत्रे स्वीकारली. या विद्यापीठाला निश्चित शैक्षणिक दिशा देण्याची मैलाचा दगड ठरणारी कामगिरी केली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून जबाबदारी स्वीकारली. देशातील विद्यापीठांची सर्वोच्च संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली. कधीकाळी या संस्थेचे अध्यक्षपद डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन यांच्यासारख्या दिग्गजांनी भूषविले होते, त्या संस्थेची धुरा सांभाळण्याचा बहुमान सांगलीच्या सुपुत्राला मिळाला. सध्या भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून काम करत आहेत. पलूससारख्या ग्रामीण भागातून आलेल्या डाॅ. साळुंखे यांची ही मजल सांगलीकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.