मुलीच्या अपहरणप्रकरणी सराईत गुंडास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:04 PM2018-04-26T23:04:58+5:302018-04-26T23:04:58+5:30

Suneet Gundas arrested in the kidnapping of a girl | मुलीच्या अपहरणप्रकरणी सराईत गुंडास अटक

मुलीच्या अपहरणप्रकरणी सराईत गुंडास अटक

Next


सांगली : विश्रामबाग परिसरात घरात घुसून अल्पवयीन मुलीची आई व भावावर हल्ला करुन मुलीचे अपहरण करणाऱ्या टोळीचा म्होरक्या चेतन ऊर्फ चैतन्य राजाराम नाईक (वय २४, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) यास पनवेल (जि. रायगड) येथे अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना बुधवारी रात्री यश आले. या अपहरणप्रकरणी एकूण सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. आतापर्यंत चौघांना अटक झाली आहे.
चेतन नाईकसह मनोज वसंत पोरे (३१), सुमित मारुती सिंदगे (१९), तनील राजाराम नाईक (२२, तिघे रा. जुना बुधगाव रस्ता, वाल्मिकी आवास, सांगली) हे चौघे अटकेत आहेत. तसेच अजय बापू कांबळे व पवन धर्मेंद्र साळुंखे यांना अजून अटक केलेली नाही. कांबळे हा जखमी असल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे, तर साळुंखे शहर पोलिसांच्या एका गुन्ह्यात कारागृहात आहे. त्यांच्याविरुद्ध अपहरण, जबरदस्तीने घरात प्रवेश करणे व बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
संशयितांनी ९ मार्च २०१८ रोजी मोटार (क्र. एमएच-११-एके-५८०२) व दुचाकीवरुन येऊन पीडित मुलीच्या घरात प्रवेश केला. मुलीच्या आईला बेदम मारहाण केली. मुलीला घरातून ओढून जबरस्तीने गाडीत आणून बसविले. मुलीच्या बहिणीने गाडी अडविण्याचा प्रयत्न केला, पण संशयितांनी तिच्या अंगावर गाडी घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. चाकू व तलवार घेऊन ते तिच्या अंगावर गेले होते.
या घटनेनंतर मुलीच्या बहिणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन विश्रामबाग पोलिसांना तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले होते.
पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस नाईक अमोल ढोले, ऋतुराज होळकर व मल्लाप्पा कट्टीमणी यांनी तांत्रिक पद्धतीने याचा तपास केला. त्यावेळी चेतन नाईक हा मुलीस घेऊन पनवेल येथे आश्रयाला असल्याची माहिती मिळाली. बुधवारी मध्यरात्री हे पथक पनवेलमध्ये दाखल झाले होते.
पनवेल तालुक्यातील दुंडरे, वाकडी, वांजे, चिंचवली भागात त्यांनी शोध घेतला. वांजे गावात शेलार बिल्डर यांच्या प्लॉटवर दोनशे खोल्या असल्याचे दिसून आले. पण यातील केवळ वीस खोल्यांत भाडेकरु असल्याची माहिती मिळाली. सर्व खोल्यांत तपासणी केल्यानंतर एका खोलीत चेतन नाईक हा संबंधित मुलीसह सापडला.
टोळीविरुध्द गंभीर गुन्हे
मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल असलेली चेतन नाईक याची टोळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. त्यांच्याविरूध्द मारामारी, हत्यार बाळगणे, चोरी, अपहरण, असे गंभीर गुन्हे सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

Web Title: Suneet Gundas arrested in the kidnapping of a girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली