सांगलीत अक्षय तृतीयेस खरेदीला सोनेरी झळाळी
By admin | Published: April 29, 2017 12:05 AM2017-04-29T00:05:28+5:302017-04-29T00:05:28+5:30
१५ कोटींची उलाढाल : सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक्ससाठी झुंबड
सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, वाहन, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी शुक्रवारी ग्राहकांनी सांगलीच्या बाजारपेठेत गर्दी केली होती. सोने खरेदी करण्यासाठी तर सराफ पेढीवर रांगा लागल्या होत्या. लग्नसराईमुळे सोने खरेदीला अधिकच झळाळी आली होती. तसेच वाहनविश्वातही मोठी उलाढाल झाली असून, दोन हजाराहून अधिक दुचाकी, तर तीनशेहून अधिक चारचाकी रस्त्यावर आल्या. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येही दोन कोटीची उलाढाल झाली.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक ग्रॅम का होईना, सोने खरेदी करावी, असा लोकांचा विश्वास आहे. म्हणूनच शुक्रवारी सकाळपासूनच सोने-चांदी खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. लग्नसराई सुरू असल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी होती. खरेदीसाठी सराफ पेठ आणि विश्रामबाग येथे पु. ना. गाडगीळ पेढी, आर. बी. भोसले ज्वेलर्ससह सर्वच सराफ पेढीवर गर्दी होती. शुक्रवारी दिवसभरात सरासरी २९ हजार २०० रुपये सोने दहा ग्रॅमचा दर राहिला, तर चांदीचा सरासरी दर ४० हजार ८०० रुपये किलोस होता. सोन्यात नेकलेस, चेन, गंठण, मंगळसूत्र, कानातले टॉप्स खरेदीसाठी अधिक ओढा होता. एक ग्रॅमच्या दागिन्यांनाही चांगलीच मागणी होती.
दुचाकी विश्वात गतवर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्के वाढ झाली होती. विविध कंपन्यांच्या दुचाकींंना चांगली मागणी होती. जास्त मायलेज देण्याऱ्या वाहनांना पसंती होती. तरुणाईत हेवी वेट आणि स्टायलिश दुचाकी खेरदी केल्या जात होत्या. दोन हजाराहून अधिक दुचाकी अक्षय तृतीयेला रस्त्यावर आल्या. इलेक्ट्रॉनिक कंपन्यांकडून सुलभ हप्त्यांची उपलब्ध केलेली सोय व पर्यायही उपलब्ध असल्याने शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकानात ग्राहकांनी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोबाईल, पंखे, फ्रीज, कुलर, एसी, एलईडी टीव्ही, होम थिएटर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. फर्निचर बाजारातही चांगली उलाढाल झाली. त्याचा लाभ उठवत ग्राहकांनी खरेदी केली. स्क्रॅच कार्ड, भेटवस्तू आणि त्वरित कर्जपुरवठा, १० ते ३० टक्क्यांपर्यंत सूट या सुविधेमुळे केवळ विंडो शॉपिंग करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनीही खरेदी केली.
चारचाकी खरेदीलाही समाधानकारक प्रतिसाद मिळाला. गेल्या काही वर्षापासून शेतीसाठी लागणारे छोटे ट्रॅक्टर्स व अवजारांच्या खरेदीला शेतकरी वर्ग प्राधान्य देत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत या छोट्या वाहनांचीही चांगली विक्री झाली.
अक्षय तृतीयेच्या सणादिवशी सोने खरेदीबरोबरच आंबा खरेदीलाही विशेष महत्त्व असते. आमरस-पोळीचा बेत घरोघरी केला जातो. त्यामुळे गुरूवारपासूनच शहरात ठिकठिकाणी आंबे खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. सांगली-मिरज रोड, कॉलेज कॉर्नरसह शहराच्या विविध भागात फळे विक्रेत्यांनी आंबा विक्रीसाठी खास स्टॉल उभारले होते. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, कर्नाटक आणि रत्नागिरी पायरी आंब्याला मागणी होती.
पाडव्याप्रमाणे अक्षय तृतीयेलाही घर खरेदीचे स्वप्न सत्यात उतरत असते. शुक्रवारी काहींनी या मुहूर्तावर फ्लॅटचे बुकिंग केले, तर अनेक बिल्डरांकडे फ्लॅटबाबत विचारणा होत होती. नोटाबंदीनंतर जमीन, घर खरेदीच्या व्यवहारावर मंदीचे सावट आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर फ्लॅट, प्लॉट व्यवसायात थोडीफार हालचाल जाणवली. ही दिलासादायक बाब आहे. आणखी काही दिवसांत जमीन, घर खरेदीच्या व्यवहारात आशादायक चित्र दिसेल, असे बांधकाम व्यावसायिक दीपक सरडे यांनी सांगितले.
एकूणच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीतील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होती. वाहन, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीतून १५ कोटीची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाडव्यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीकरांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला (प्रतिनिधी)
दुचाकी खरेदी : ग्राहकांचा प्रतिसाद
३१ मार्चला दुचाकी कंपन्यांकडून बीएस ३ मानांकनाच्या वाहनांची, मोठी सूट देऊन विक्री करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या पंधरवड्यात आलेल्या अक्षय तृतीयेला वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होणार का? याबाबत दुचाकी वाहन वितरकांमध्ये शंका होती. पण शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला. तारळेकर, ट्रायकलर होंडा, पट्टणशेट्टी होंडा, मिलेनियम होंडासह सर्व शोरूममध्ये दिवसभर गर्दी होती. गतवर्षीच्या अक्षय तृतीयेच्या तुलनेत यावर्षी दुचाकी विक्रीत दहा ते बारा टक्के वाढ झाल्याचे श्रीकांत तारळेकर यांनी सांगितले.
‘चारचाकी’लाही मागणी
नोटाबंदी, मंदीच्या काळातही चारचाकी वाहन खरेदीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्वच वाहन विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होती. जवळपास तीनशेहून अधिक चारचाकी वाहनांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. त्यातून चार ते पाच कोटीची उलाढाल एकट्या चारचाकी वाहन विक्रीतून झाल्याचे सांगण्यात आले.