सुनील चव्हाण यांचा पत्नीसह खून
By admin | Published: January 21, 2015 12:09 AM2015-01-21T00:09:38+5:302015-01-21T00:09:50+5:30
डफळापुरातील घटना : चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जतचे माजी सभापती, सांगली जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष
जत/डफळापूर : सांगली जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष व जत पंचायत समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते सुनील रामचंद्र चव्हाण (वय ५४) व त्यांची पत्नी शैला सुनील चव्हाण (४७, रा. डफळापूर, ता. जत) यांचा अज्ञातांनी धारदार हत्याराने वार करून काल, सोमवारी मध्यरात्री निर्घृण खून केला. ही घटना डफळापूर-कोकळे रस्त्यावरील चव्हाण यांच्या मळ््यातील बंगल्यात घडली. या दुहेरी खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. घटनेमुळे जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. डफळापूर-कोकळे रस्त्यावरील शेतात चव्हाण यांनी तीन वर्षांपूर्वी बंगला बांधला आहे. तेथे ते सपत्नीक राहत होते. त्यांना दोन मुले असून त्यापैकी दिग्विजय हा मुंबईत विधी महाविद्यालयात, तर हर्षवर्धन सांगली येथे स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या मळ््यात रमेश आठवले (रा. कुडनूर, ता. जत) व परशुराम हिप्परगी (रा. चमकेरी, ता. अथणी, जि. बेळगाव) हे दोन कामगार आहेत. त्यापैकी परशुराम मळ््यातच मुक्कामास आहे.सोमवारी सकाळी सुनील चव्हाण माजी आमदार उमाजी सनमडीकर यांच्यासमवेत सांगलीला गेले होते. मुलाला भेटून व तेथील कामे झाल्यानंतर बोलेरो गाडीतून चालक मुन्ना शिंदे (रा. डफळापूर) यांना घेऊन रात्री साडेआठच्या दरम्यान ते परत आले होते. शिंदे यांना गावात सोडून ते गाडीतून एकटेच मळ््यात आले होते.मारेकऱ्यांनी मध्यरात्रीनंतर बंगल्यातील बेडरुममध्ये प्रवेश करून धारदार सत्तूर, विळा व कटरच्या चेनने चव्हाण व त्यांच्या पत्नीवर निर्घृणपणे वार केले. त्यात दोघे जागीच मृत झाले. चव्हाण व त्यांच्या पत्नीने प्रतिकार करताना हातातील अंगठ्या, मणीमंगळसूत्र, गळ््यातील साखळीला ओढ बसली. मारेकऱ्यांनी खून केल्यानंतर सर्व हत्यारे बंगल्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या हौदात धुतली. तेथेच हातपाय धुऊन बंगल्यासमोरील चारचाकी घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला. गाडी हौदास धडकून खड्ड्यात गेल्यामुळे ती तेथेच सोडून त्यांनी बंगल्यातील होंडा शाईन दुचाकीची (एमएच १० एझेड ३०६१) चावी घेऊन त्यावरून पलायन केले. त्यामुळे मारेकरी चार ते सहा असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खुनानंतर परशुराम हिप्परगी हा कामगार बेपत्ता झाला. त्याच्या खोलीत रक्ताने माखलेली पॅँट पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी कर्नाटकात गेले आहे.
सोमवारी मध्यरात्री चव्हाण पती-पत्नीचा खून झाल्यानंतर ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहापर्यंत कोणालाही माहीत नव्हती. मारेकऱ्यांनी बाहेर जाताना दरवाजा बंद केला होता. रमेश आठवले हा कामगार दूध काढून घेऊन आला. परंतु बंगल्यातून काहीच आवाज येत नसल्याने त्याने गावात नातेवाईकांना कळवले. त्यानंतर चव्हाण यांचे पुतणे महेश चव्हाण व ग्रामस्थांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.मारेकऱ्यांनी बंगल्यातील कोणतीही वस्तू नेली नाही. बंगल्यात दोन लाखाची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने होते. मात्र मारेकऱ्यांनी केवळ चव्हाण यांचा मोबाईल नेला आहे. घरातील दूरध्वनी संच बाहेर आणून जाळला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी घटनास्थळास भेट देऊन पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मार्गदर्शन केले. माजी आमदार उमाजी सनमडीकर, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, सुरेश शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, मन्सूर खतीब, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील, भारती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, तानाजी बोराडे, सुुनील पवार, प्रमोद सावंत आदींनी घटनास्थळास भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. चव्हाण यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे. जत येथे दुपारी शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा डफळापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
सनमडीकर यांना फोन
माजी आमदार उमाजी सनमडीकर यांनी पोलिसांना सांगितले की, रात्री दोनच्या सुमारास त्यांना सुनील चव्हाण यांच्या मोबाईलवरून कॉल आला. ‘मी सुनील चव्हाण बोलतोय,’ असे त्या व्यक्तीने सांगितले.
मात्र, सनमडीकर यांनी त्याला ‘हा आवाज सुनील चव्हाण यांचा नाही’, असे सांगताच त्याने मोबाईल बंद केला. चव्हाण यांचा मोबाईल घटनास्थळी मिळालेला नाही.
धागेदोरे हाती, छडा लागेल : सावंत
जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत ते जतमध्ये तळ ठोकून होते. ते म्हणाले की, अत्यंत अमानुषपणे खून झाल्याने यामागील कारणांचा शोध घेतला जाईल. जत पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपास करीत आहे. काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. सुनील चव्हाण यांचा शेतगडी बेपत्ता आहे. यामुळे त्याच्यावर संशय बळावला आहे. चव्हाण यांच्या हातातील अंगठ्या तसेच त्यांच्या पत्नीच्या अंगावरील काही दागिने
गायब आहेत. चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधून तपासाला दिशा दिली आहे; मात्र तपासाच्या दिशा बदलण्यासाठी संशयितांकडून चोरीचा बनाव केला जाऊ शकतो. चोरी, पूर्ववैमनस्य अथवा अन्य काही अशा विविध मुद्द्यांवर तपास सुरू आहे. लवकरच याचा छडा लावला जाईल.