सांगलीतील वीस हजारावर मुस्लिमांचा सण सुनासुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:22 AM2019-08-13T00:22:04+5:302019-08-13T00:24:57+5:30

अनेकांना पुनर्वसन केंद्रात केवळ शांत बसण्याखेरीज कोणताही पर्याय राहिला नाही. शहराला संकटातून मुक्त करण्याची दुवा मागून त्यांनी सोमवारी ईदची नमाज अदा केली.

Sunsuna festival of Muslims over twenty thousand in Sangli | सांगलीतील वीस हजारावर मुस्लिमांचा सण सुनासुना

सांगलीतील मराठा सेवा संघाच्या पुनर्वसन केंद्रात पूरग्रस्त म्हणून दाखल झालेल्या मुस्लिम कुटुंबीयांचा यंदाचा बकरी ईदचा सण सुना सुना गेला.

googlenewsNext
ठळक मुद्देव्यथा पूरग्रस्तांची : ईदला ना मेहंदी, ना कपडे, ना शिरखुर्मा

अविनाश कोळी ।

सांगली : यंदा सांगली शहरातील वीस हजारावर पूरग्रस्त मुस्लिम बांधवांना प्रथमच बकरी ईदचा सण सुनासुना घालविण्याची वेळ आली. कृष्णा नदीच्या जलप्रलयाच्या तडाख्यात होत्याचे नव्हते झाल्याने, अनेकांना पुनर्वसन केंद्रात केवळ शांत बसण्याखेरीज कोणताही पर्याय राहिला नाही. शहराला संकटातून मुक्त करण्याची दुवा मागून त्यांनी सोमवारी ईदची नमाज अदा केली.

सांगलीच्या शंभरफुटी, शामरावनगर, फौजदार गल्ली, खणभाग, गवळी गल्ली, सांगलीवाडी, मगरमच्छ कॉलनी या भागात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतो. हे सर्व भाग यंदा महापुराने गिळंकृत केले होते. या भागातील २0 हजारावर मुस्लिम समाज स्थलांतरित झाला. बहुतांश कुटुंबे गरीब असल्याने त्यांनी पुनर्वसन केंद्रात आसरा घेतला. कुणी दूरच्या नातेवाईकांकडे गेले, तर कुणी मित्रांकडे तात्पुरता निवारा शोधला. कितीही अडचणी आल्या तरी, स्वत:च्या घरी जमेल त्याप्रमाणे सण साजरा करण्याची रीत यंदा जलप्रलयामुळे मोडीत निघाली. काहींना नमाजसुद्धा अदा करता आली नाही. केंद्रात बसल्याठिकाणी त्यांनी अल्लाहकडे, प्रलयातून लवकर शहराला मुक्त करण्याची दुवा मागितली. पुरुष मंडळींनी जवळ असलेल्या मशिदीमध्ये नमाजपठण केले. मात्र मेहंदी, पोरा-बाळांना नवे कपडे, खीर अशा सणाच्या गोडव्यापासून हा समाज यंदा दूर राहिला.

ईदगाह मैदानावरील : परंपरा खंडित
आजवर कधीही ईदगाह मैदानावरील नमाज पठणाची परंपरा खंडित झाली नव्हती. यंदा महापुराच्या विळख्यात हा परिसर गेल्यामुळे प्रथमच ईदगाह मैदानावरील सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम खंडित झाला. काही मशिदीही पाण्यात होत्या. त्यामुळे अन्य मशिदींमध्ये समाजातील लोकांनी नमाज अदा केली.

 

सांगली शहरातील वीस हजारावर मुस्लिम समाज आज पूरग्रस्त आहे. पुनर्वसन केंद्रात यांची संख्या मोठी असली तरी, मित्र, नातेवाईक यांच्याकडेही बऱ्याचजणांचे स्थलांतर झाले आहे. ईदगाह मैदानावर यंदा सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. ही परंपरा आणि सण साजरा करण्याची परंपरा प्रथमच या संकटामुळे खंडित झाली आहे. पूरग्रस्त व सुरक्षितस्थळी असलेल्या मुस्लिम समाजाने यंदा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केलेला नाही. पूरस्थितीचे भान त्यांनी ठेवले.
- हारुण शिकलगार, अध्यक्ष, ईदगाह कमिटी, सांगली


आज ईद आहे, याचे स्मरणसुद्धा झाले नाही, इतका झटका या संकटाने दिला. घरात कितीही संकट आले तरी आम्ही दरवर्षी सण साजरा करतो. यंदा मात्र निसर्गाने आम्हाला यापासून दूर ठेवले. सणाच्या आनंदापेक्षा संकटाच्या वेदनांचेच मनात घर आहे.
- बाबुभाई तांबोळी, नुराणी मोहल्ला, सांगली


यंदा परंपरेप्रमाणे आम्हाला ईद साजरी करता आली नाही. पूरग्रस्त म्हणून जीवन जगावे लागत आहे. सणाचा आनंद कोणालाच मिळाला नाही. अल्लाह सर्वधर्मिय लोकांच्या आयुष्यातील आलेल्या अडचणी दूर करेल, असा विश्वास आहे.
- गफूर मुजावर, शामरावनगर, सांगली

आयुष्यात मी कधीही अशी ईद अनुभवली नाही. घरापासून दूर एखाद्या पुनर्वसन केंद्रात आम्हाला शांतपणे पडून राहावे लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.
- जुबेदा इकबाल शेख, रमामातानगर.

यंदा आम्ही ईद साजरी करू शकलो नाही, याचे खूप वाईट वाटत आहे. आयुष्यात एकही सण आम्ही असा घालवला नाही. पण पुनर्वसन केंद्रात माणुसकीचा ओलावा, प्रेम मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे. संकटातून सर्वांनाच अल्लाहने लवकरात लवकर बाहेर काढावे, हीच प्रार्थना!
- नाहिदा शेख, शंभरफुटी रोड, सांगली

 

Web Title: Sunsuna festival of Muslims over twenty thousand in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.