‘मिरज सिव्हिल’मध्ये ‘सुपर मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालय उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:44+5:302021-02-27T04:34:44+5:30
मिरज : मिरजेत शासकीय रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी असल्याने येथे अतिविशेष उपचार (सुपर मल्टीस्पेशालिटी) रुग्णालय उभा करण्यासाठी पाठपुरावा सुरू ...
मिरज : मिरजेत शासकीय रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी असल्याने येथे अतिविशेष उपचार (सुपर मल्टीस्पेशालिटी) रुग्णालय उभा करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.
मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी महाविद्यालयाच्या जागेची पाहणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. मिरज शासकीय महाविद्यालय रुग्णालयात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णसंख्या मोठी असल्याने येथे विशेष उपचार सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी दिली.
अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद या ठिकाणी सुरू होत असलेल्या सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे या मिरजेचाही प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करण्याच्या सूचना राज्यमंत्री यड्रावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, उपअधिष्ठाता डॉ. रूपेश शिंदे, डाॅ. रजनी जोशी, डॉ. शेखर प्रधान डॉ. शिशिर मिरगुंडे यांच्यासह बांधकाम विभागाचे उपअभियंता अबूबकर शेख उपस्थित होते.