पोलीस कुटुंबियांच्या लसीकरणासाठी अधीक्षकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:24+5:302021-07-14T04:32:24+5:30
सांगली : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस दल चोवीस तास ऑनड्युटी आहे. पोलिसांसोबतच त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाप्रतिबंधक लस मिळावी, यासाठी ...
सांगली : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस दल चोवीस तास ऑनड्युटी आहे. पोलिसांसोबतच त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाप्रतिबंधक लस मिळावी, यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पोलीस वसाहतीत लसीकरण केंद्र सुरू केले असून, सुमारे अडीच हजारजणांना लाभ दिला जाणार आहे.
कोरोना संसर्गात नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस दल रस्त्यावर उतरून सेवा बजावत आहे. पहिल्या टप्प्यात पोलिसांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले. तसेच पन्नास वर्षांवरील अंमलदारांना केवळ कार्यालयीन कामच दिले गेले. प्रत्येक पोलीस अंमलदाराची आणि कुटुंबियांची आठवड्यातून एकदा वैद्यकीय तपासणीही केली जात आहे. लसीकरणात पोलीस कुटुंबियांनाही लस मिळाली पाहिजे, यासाठी अधीक्षक गेडाम यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे पाठपुरावा केले. त्यानंतर विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीत ३० एप्रिल रोजी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. रोज सरासरी दोनशेजणांना लस देण्यात येते. यात प्राधान्याने पोलीस कुटुंबियांचा समावेश आहे. भागातील इतरांनाही या केंद्राचा फायदा झाला. आत्तापर्यंत सुमारे अडीच हजार पोलीस कुटुंबियांना लस देण्यात आली. याबाबत केंद्रप्रमुख डॉ. अर्चना सावंत म्हणाल्या की, या केंद्रावर पोलीस कुटुंबियांना प्राधान्याने लस दिली जाते. अडीच हजारजणांना अत्तापर्यंत लस दिली आहे. लस उपलब्ध होईल, त्यानुसार लसीकरण केले जात आहे.