महासत्ता म्हणजे भारतीय पुढाऱ्यांनी दाखविलेले गाजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:26+5:302021-01-04T04:23:26+5:30
‘कोरोनानंतरचे जग’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, अरुण लाड, उत्तम कांबळे, गौराबाई कुंभार आदींच्याहस्ते झाले. लोकमत न्यूज नेटवर्क ...
‘कोरोनानंतरचे जग’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, अरुण लाड, उत्तम कांबळे, गौराबाई कुंभार आदींच्याहस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : २०२० मध्ये भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत होतो, प्रत्यक्षात उपासमारीने माणसे मरण्याची वेळ आली. महासत्ता हे पुढाऱ्यांनी दाखविलेले गाजर असल्याची टीका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार संपादित ''''''''कोरोनानंतरचे जग'''''''' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. आमदार अरुण लाड अध्यक्षस्थानी होते.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले की, २५-३० वर्षांत अनेक साथी आल्या. त्या तशाच आहेत. आता कोरोना नवा आहे. लोकसंख्या वाढते तेव्हा ती नियंत्रित करण्यासाठी निसर्ग शस्त्रे वापरतो. अशा साथी व माणूस यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू आहे. माणूस त्यावर मात करत गेला. युद्ध सुरू आहे, पण भारत त्यात कोठेही नाही. कोरोनाची लस शोधली तरीही त्यात परदेशी सहभाग आहे. मूलभूत संशोधनाकडे आपले दुर्लक्ष झाले. आता काहीतरी धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
लाड म्हणाले की, कोरोनामुळे प्रतिकार क्षमता वाढविण्याचा संदेश मिळाला. अशी संकटे येत राहतील. ती आपणच ओढवून घेत आहोत. याविरोधात लढण्यासाठी जगण्याची आचारसंहिता तयार करुया.
साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले की, कोरोनाच्या निमित्ताने जगाचा प्रवास जगण्या-मरण्याच्या उंबरठ्यावरून सुरू आहे. या काळात माणूस एकटा पडला.
यावेळी व्ही. वाय. पाटील, ॲड. के. डी. शिंदे, संपादक कुंभार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला गौराबाई कुंभार, ज्योती कुंभार, राहुल कुंभार, सरिता कुंभार आदी उपस्थित होते. डॉ. सर्जेराव जाधव यांनी आभार मानले.
------------