सांगलीत घरगुती गॅसचे रिफिलिंग करताना पुरवठा विभागाच्या धाडी, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 05:27 PM2024-05-31T17:27:01+5:302024-05-31T17:27:17+5:30
लोकमतच्या बातमीनंतर पुरवठा विभागाकडून कारवाईचा धडाका
सांगली : शहरात घरगुती गॅसचा अवैधरित्या तीन व चार चाकी वाहनांमध्ये रिफिलिंग होत असल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांच्याकडे प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर होत असलेल्या ठिकाणी धाडी टाकून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पहिली धाड सांगली शहरात टाकली असून एक विद्युत मोटार, काही गॅसच्या पुंगळ्या, पाइप इत्यादी साहित्य जप्त केले. परंतु, याठिकाणी अवैध व्यवसाय करणारे कोणीही सापडले नाही. त्यामुळे धाडीत मिळालेल्या वस्तू ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे.
आणखी एका ठिकाणी गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सांगली येथील ५० फुटी रोडवर असलेल्या अलअमीन मराठी प्री-प्रायमरी शाळेजवळ मिलन गादी कारखान्याशेजारी मोकळ्या जागेत हाच प्रकार सुरू होता. घरगुती गॅस दुसऱ्या गॅस टाकीमध्ये रिफिलिंग करताना दोन भरलेले व एक रिकामी असे तीन सिलिंडर, एक इलेक्ट्रिक वजन काटा, इतर साहित्य जप्त केले. संबंधिताविरोधात सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांनी तक्रार करावी..
जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी आशिष फुकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक गोपीचंद वडार, श्रीकांत चोथे, वर्षा कदम, निखिल सोनवणे यांनी ही कारवाई केली. नागरिकांनी असा प्रकार तुमच्या भागात होत असल्याचे आढळून आल्यास सांगलीच्या जिल्हा अन्नपुरवठा कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन आशिष फुकुले यांनी केले आहे.