भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी मोदींना साथ द्या, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 01:01 PM2023-03-24T13:01:05+5:302023-03-24T13:01:33+5:30
७० वर्षांच्या काळात विकासापेक्षा राजकारण जास्त झाले
इस्लामपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्रातून आलेल्या सर्व योजना ठप्प होत्या. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नव्हते. राज्यात भाजप-सेनेचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. देशाला जागतिक स्तरावरील आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या, असे आवाहन केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी केले.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे पक्षप्रभारी म्हणून सिंधिया हे वाळवा आणि शिराळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.
पेठनाका येथे त्यांनी महाडिक शैक्षणिक संकुलातील नवमतदार असलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. देशाचे भविष्य तरुणाईच्या हाती आहे. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सिंधिया म्हणाले, ७० वर्षांच्या काळात विकासापेक्षा राजकारण जास्त झाले. शेतकरी, महिलांच्या हाती काहीच पडले नाही. मात्र गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि प्रगतीचा विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविला जात आहे.
विक्रम पाटील म्हणाले, शहरामध्ये पक्षावर निष्ठा असणारी शेकडो घरे आहेत. या सर्वांना सोबत घेत पक्षाचे संघटन वाढवत आहोत.
यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, समरजितसिंह घाटगे, मकरंद देशपांडे, राहुल महाडिक, निशिकांत पाटील, माजी आमदार भगवानराव साळुुंखे, सी. बी. पाटील, जयसिंगराव शिंदे, जयराज पाटील, जयकर पाटील, श्रीकांत शिंदे, महेश पाटील, सागर खोत उपस्थित होते.
युवकांचा विश्वास
सम्राट महाडिक म्हणाले, युवकांना विश्वास देत त्यांना सोबत घेऊन देशाचा विकास साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. त्याला युवकांनी साथ द्यावी.