पलूसच्या मैदानात सूरज निकम विजयी घोषित
By admin | Published: August 29, 2016 10:59 PM2016-08-29T22:59:49+5:302016-08-29T23:13:59+5:30
समाधान घोडके जखमी : श्रावण सोमवारनिमित्त आयोजित कुस्ती मैदानास शौकिनांची गर्दी
पलूस : पलूस येथे आयोजित कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी समाधान घोडके विरूध्द सूरज निकम (पुणे) यांच्यातील पहिल्या क्रमांकाच्या लढतीत समाधान घोडकेच्या डोळ्यास जखम झाल्याने सूरज निकम याला विजयी घोषित करण्यात आले. पहिल्या क्रमांकाचे दीड लाखाचे इनाम देऊन त्याला गौरविण्यात आले.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त पलूस येथे दरवर्षी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते. रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी विक्रम पाटील युवा शक्तीच्यावतीने प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते पहिल्या क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. सुरूवातीपासूनच समाधान आक्रमक होता. सूरजवर त्याने पकडही मिळविली, पण ऐन मोक्याच्या क्षणी डोळ्यास जखम झाल्याने त्याने लढतीतून माघार घेतली. त्यानंतर पंचांनी सूरज निकम याला विजयी घोषित केले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती माऊली जमदाडे (पंढरपूर) व मारूती जाधव (आटपाडी) यांच्यात झाली. माऊलीने दोनवेळा पट्टी डावावर मारूतीला खाली घेतले, मात्र दोन्ही वेळेला मारूतीने चपळाईने सुटका करून घेतली. सतरा मिनिटे चाललेल्या या लढतीत गुणांच्या आधारे माऊली जमदाडेला विजयी घोषित करण्यात आले. त्याला जगदंबा ग्रुपच्यावतीने प्रदीप वेताळ व दिगंबर पाटील यांनी एक लाखाचे इनाम दिले.
तृतीय क्रमांकाची लढत अण्णासाहेब कोळेकर व समिंदर देसाई (गारगोटी) यांच्यामध्ये चुरशीने झाली. पंधराव्या मिनिटाला कोळेकर याने देसाईवर घिस्सा डावावार विजय मिळविला. त्याला पलूस सहकारी बॅँकेच्यावतीने अध्यक्ष वैभव पुदाले यांनी ७५ हजार रुपयांचे इनाम दिले.
चौथ्या क्रमांकाची संतोष दोरवड (टाकळी) विरुद्ध अमित कुमार (दिल्ली) व पाचव्या क्रमांकाची हसन पटेल (दिल्ली) विरूध्द आप्पा बुट्टे (इंदापूर) यांच्यामधील लढत बरोबरीत झाली.
याशिवाय मैदानात झुंझार पाटील (पलूस), सत्यजित पाटील (नागराळे), रणजित निकम, अमोल पवार, श्रीकांत लेंगरे, प्रमोद शिंदे यांनी चटकदार कुस्त्या केल्या. सागर मोरे (पलूस), नवनाथ पिंगळे (कोल्हापूर), अमर कुंभार (कुंडल), रणजित खांडेसर (नागराळे), हर्षवर्धन देशमुख (पलूस), गणेश येसुगडे (पलूस) यांनी चटकदार कुस्त्या केल्या.
दुपारी ३ वाजता मैदानाचे पूजन पलूसचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याहस्ते झाले. यावेळी श्रावण सोमवार कुस्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र सदामते, खाशाबा दळवी, प्रताप गोंदील, संजय गोंदील, प्रताप गोंदील, विश्वास येसुगडे, रावसाहेब गोंदील, अमर इनामदार, पोपट मोरे, वैभवराव पुदाले, गिरीश गोंदील, विक्रम पाटील उपस्थित होते. मैदानात प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, मोहनराव कदम, अरुण लाड, महेंद्र लाड, जितेश कदम, शरद लाड आदींनी भेटी दिल्या. (वार्ताहर)
महिला कुस्ती
या मैदानात महिला कुस्ती घेण्यात आली. संजना बागडी (तुंग) व हर्षदा मगदूम (हरिपूर) यांच्यात कुस्ती झाली. यामध्ये एकेरीपट काढून बागडी हिने विजय मिळविला.