भाजपमध्ये सुरेश आवटी ठरले ‘वजनदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:31+5:302021-09-10T04:32:31+5:30

शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी विरोधकांनी केलेली मोर्चेबांधणी, फोडाफोडीच्या राजकारणाला आलेला ऊत, अर्थपूर्ण ...

Suresh Avati becomes 'weighty' in BJP | भाजपमध्ये सुरेश आवटी ठरले ‘वजनदार’

भाजपमध्ये सुरेश आवटी ठरले ‘वजनदार’

Next

शीतल पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी विरोधकांनी केलेली मोर्चेबांधणी, फोडाफोडीच्या राजकारणाला आलेला ऊत, अर्थपूर्ण तडजोडी, पक्षांतर्गत नाराजी यावर मात करीत अखेर भाजपचे नेते सुरेश आवटी यांनी सभापतीपद खेचून आणले. मुलगा निरंजन आवटी यांना सदस्य करण्यापासून ते सभापतिपद मिळवून देण्यापर्यंत त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली. कुटुंबात तिसऱ्यांदा सभापतीपद खेचून आणले. यामुळे भाजपमध्ये तेच ‘वजनदार’ ठरले.

फेब्रुवारीत महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपला धक्का बसला होता. राष्ट्रवादीने भाजपचे सात नगरसेवक फोडले होते. त्यामुळे स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूकही रंगतदार होणार, हे स्पष्ट होते. भाजपने नूतन सदस्य निवडीत निष्ठावंतांऐवजी बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याने विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा उंचावल्या होत्या.

नूतन स्थायी सदस्यांत निरंजन आवटी यांचे नाव आल्यानंतरच तेच सभापती होणार, अशी अटकळ बांधली जात होती. पण सभापतिपदाचा मार्ग काटेरी होता. पक्षातीलच काहींनी निरंजन यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी फिल्डिंग लावली होती. पण सुरेश आवटी यांनी उमेदवारी खेचून आणली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या निकटच्या संबंधांचा फायदा झाला.

दुसरीकडे भाजपचे तीन सदस्य काँग्रेसच्या गळाला लागले होते. त्यांच्याशी अर्थपूर्ण बोलणीही सुरू होती. याची कुणकुण लागताच भाजपच्या नऊ सदस्यांना हैदराबाद सहलीवर पाठविण्यात आले. ते शहराबाहेर गेल्याने काँग्रेसचा डाव फसला. त्यात आवटी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन नवा डाव टाकला. त्यामुळे राष्ट्रवादीने पाय मागे घेत काँग्रेसला एकाकी पाडले. पक्षांतर्गत विरोधकांना भविष्यातील स्वप्ने दाखवत शांत करण्यात आवटी यशस्वी ठरले. चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुलाची उमेदवारी जाहीर करून घेतली. त्यामुळे विरोधाचा प्रश्न उरला नाही. नंतर काँग्रेसच्या फोडाफोडीलाही शह दिला. भाजपच्या सत्ताकाळात त्यांनी सलग दुसऱ्यांदा सभापतीपद कुटुंबात आणले. एकूणच भाजपमध्ये सुरेश आवटीच राजकीयदृष्ट्या वजनदार ठरल्याचे दिसते.

चौकट

महापौरपदाची मात्र हुलकावणी

सुरेश आवटींना महापौरपदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. विकास महाआघाडीच्या काळात त्यांना महापौर होण्याची संधी होती; पण इद्रिस नायकवडी यांनी राजीनामा दिला नाही. त्यानंतर काँग्रेसच्या काळातही त्यांना हुलकावणी मिळाली. भाजपच्या सत्ताकाळात मुलगा निरंजन महापौरपदाचा दावेदार होता. पण त्याला उमेदवारी मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

Web Title: Suresh Avati becomes 'weighty' in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.