सुरेश आवटी यांचे नगरसेवकपद रद्द
By admin | Published: August 6, 2016 12:33 AM2016-08-06T00:33:54+5:302016-08-06T00:37:01+5:30
उच्च न्यायालय : जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम; दगडफेकप्रकरणी झाली होती शिक्षा
सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरविण्याचा जिल्हा न्यायालयाचा निकाल शुक्रवारी उच्च न्यायालयानेही कायम ठेवला. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आर. पी. सोंडूरबलदोटा यांनी आवटी यांची याचिका फेटाळून लावली. त्यांना सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. या निकालाने महापालिकेतील काँग्रेसला धक्का बसला आहे.
महापालिकेच्या २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मिरजेतील प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेश आवटी विजयी झाले होते. आवटी यांना मिरज कार्यालयावरील दगडफेकप्रकरणी २०११ मध्ये मिरजेतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षे दहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. उमेदवारी अर्ज छाननीवेळी कुणीही त्यांच्या अर्जाबाबत हरकत घेतली नव्हती. त्यामुळे ते निवडणुकीस पात्र ठरले. त्यानंतर निवडूनही आले. छाननीवेळी त्यांच्या शिक्षेला स्थगिती नव्हती. त्यामुळे याच मुद्द्यांवर या प्रभागातील पराभूत उमेदवार आबा पाटील यांनी याचिका दाखल केली होती.
निवडणूक प्रतिज्ञापत्रातील शिक्षेची माहिती लपविण्यात आली आहे. मिरज न्यायालयाने नैतिक अध:पतन झाल्याचे ताशेरे ओढत, आवटी यांच्यासह अन्य काही लोकांना शिक्षा सुनावली होती. निकालपत्रात आवटी व इतर महापालिकेचे नगरसेवक विश्वस्त असताना, त्यांनी मालमत्तेचे नुकसान केले, ते नैतिक अध:पतनच असल्याचे नमूद केले होते. महाराष्ट्र महापालिका कायदा कलम १० (१) अ नुसार न्यायालयाने नैतिक अध:पतनाखाली एखाद्याला शिक्षा सुनावली असेल, तर त्याला निवडणूक लढविता येत नाही, अशी तरतूद आहे. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्यांचे नगरसेवकपद रद्द केले होते. त्यानंतर आवटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेले सहा महिने या याचिकेवर सुनावणी सुरू होती. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सोंडूरबलदोटा यांनी आवटी यांना अपात्र ठरवीत जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. या खटल्यात आवटी यांच्यावतीने अॅड. एम. एल. पाटील यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
मैनुद्दीन बागवान यांचे काय?
मिरज कार्यालयावरील दगडफेकीत सुरेश आवटी यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचेही नगरसेवकपद रद्द झाले होते. बागवान यांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर २० आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आवटी अपात्र ठरल्याने आता बागवान यांच्या निकालाकडेही मिरजकरांचे लक्ष लागले आहे.
सुप्रिम कोर्टात अपिलासाठी दीड महिना
उच्च न्यायालयाने आवटी यांचे नगरसेवकपद रद्द ठरविले असले तरी, सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत ते नगरसेवक म्हणून कायम राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करायचे की नाही, याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे आवटी यांनी सांगितले.
महापौर पदाचे दावेदार : सुरेश आवटी महापौर पदाचे दावेदार होते. फेब्रुवारी महिन्यात महापौर निवडीवेळी आवटी व त्यांच्या समर्थकांनी तयारी केली होती; पण हारूण शिकलगार यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. नऊ महिन्यांनंतर आवटी यांना महापौर करण्याचे आश्वासनही दिले होते; पण आता पदच रद्द झाल्याने महापौर पदाच्या शर्यतीतून ते बाद ठरले आहे.