उत्तम शेतकरी ते मंत्री व्हाया यशस्वी व्यावसायिक, सुरेश खाडेंचा राजकीय प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:26 PM2022-08-09T13:26:07+5:302022-08-09T13:29:30+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप-सेनेच्या सरकारमध्ये शेवटचे वर्षभर त्यांना सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले होते.
श्रीनिवास नागे
मिरज (सांगली) : उत्तम शेतकरी ते मंत्री व्हाया यशस्वी व्यावसायिक असा राजकीय प्रवास केलेल्या सुरेश खाडे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा भाजपतर्फे आमदार सुरेश दगडू खाडे यांनी विजय मिळविला आहे.
१ जून १९५८ रोजी तासगाव तालुक्यात पेड येथील गरीब दलित कुटुंबात जन्मलेल्या सुरेश खाडे यांनी व्हीजेटीआय, मुंबई येथून वेल्डिंग डिप्लोमा (पदविका) पूर्ण केला. सुरुवातीला जत आणि नंतर मिरज राखीव विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप-सेनेच्या सरकारमध्ये शेवटचे वर्षभर त्यांना सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले होते.
विधानसभेची अनुसूचित कल्याण समिती, अंदाज समिती, पंचायत राज समिती, उपविधान समितीचे सदस्य, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक, सांगली जिल्हा ग्रामीण भाजप अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
जिल्ह्यात पहिले कमळ फुलविले
२००४ मध्ये जत राखीव मतदारसंघातून निवडून येऊन खाडे यांनी जिल्ह्यात पहिले कमळ फुलविले. त्यानंतर २००९ साली मुस्लीमबहुल मिरज मतदारसंघात प्रथमच खाडे यांनी भाजपला विजय मिळवून दिला. २००९ साली ५४ हजार व २०१४ साली ६४ हजारांचे मताधिक्य त्यांनी घेतले. दोन्ही वेळेस त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. मात्र, त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य ३० हजारांपर्यंत कमी झाले.
गेल्या पाच वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली मिरज मतदारसंघात ४९ पैकी ३७ ग्रामपंचायतीत भाजपने बहुमत मिळविले. स्वातंत्र्यापासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली मिरज पंचायत समितीची सत्ता मिळविली. ७ पैकी ५ जिल्हा परिषद गटात भाजपचे सदस्य निवडून आले. महापालिकेत मिरज शहरातील २७ पैकी १३ नगरसेवक निवडून आले. मिरजेत इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी सुरू केली आहे. सामाजिक कार्याबद्दल कोलंबो विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना सन्मानित केले आहे. दास ऑफशोअर हा उद्योग व शेती त्यांचा व्यवसाय आहे. पत्नी सुमन, विवाहित मुले प्रशांत व सुजीत असा त्यांचा परिवार आहे. दोन्ही मुलांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. समाज कार्य, वाचन व संगीताची आवड असलेले आमदार सुरेश खाडे पंढरीच्या विठ्ठलाचे भक्त आहेत.