मालगावमध्ये सुरेश खाडे यांना गावबंदीचा निर्णय
By admin | Published: February 11, 2016 12:23 AM2016-02-11T00:23:29+5:302016-02-11T00:32:09+5:30
गरामसभेत ठराव : ‘म्हैसाळ’ पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध
मालगाव : म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे आ. सुरेश खाडे यांच्या भूमिकेवर मालगाव (ता. मिरज) येथील ग्रामसभेत हल्लाबोल करण्यात आला. पूर्वभागातील जनतेला वाऱ्यावर सोडत पाणीप्रश्नी सोयीची भूमिका घेणाऱ्या आमदारांना गावबंदी करण्याच्या मागणीचा ठराव घेण्यासही संतप्त ग्रामस्थांनी भाग पाडले.
मालगाव येथील प्रजासत्ताकदिनी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा सरपंच प्रशांत माळी यांच्या अध्यक्षतेखाली व जि. प. सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, उपसरपंच शशिकांत कनवाडे, गटनेते प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडली. ग्रामसभा म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नावरुन गाजली. राज्य शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे योजनेचे आवर्तन लांबल्याने पाण्याच्या भरवशावर उभ्या केलेल्या द्राक्ष, केळी, डाळिंबबागा, पानमळे उद्ध्वस्त होत आहेत. अशा बिकटप्रसंगी मिरजेचे आमदार सुरेश खाडे नेमके आहेत तरी कोठे, असा संतप्त सवाल सभेत करण्यात आला. निवडणुकांत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करून देऊ, असे सांगणारे आ. खाडे यांच्या पक्षाच्या शासनाने शेतकऱ्यांच्या सात-बारावर म्हैसाळ योजनेच्या थकबाकीचा बोजा चढवला. आ. खाडे यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत, शेतकरी संघटनेचे संजय खोलकुंबे, महेश सकपाळ, विजय खोलकुंबे, बाबासाहेब पाटील व भास्कर भंडारे यांनी, म्हैसाळ योजनेचे पाणी सुटेपर्यंत आ. खाडे यांना गावबंदी करण्याची मागणी केली.
या मागणीवर एकवटलेल्या ग्रामस्थांनी गावबंदीचा तसा ठराव करण्यास भाग पाडले. सभेत आ. खाडे यांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सभेत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचे प्रभागात समान वाटप करण्याची मागणी अरुण धामणे यांनी केली. पूर्वीची कर आकारणी रद्द होऊन, शासन आदेशानुसार भांडवली मूल्यांकनावर आधारित घरपट्टी वसुली पध्दत राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी मनोहर धेंडे यांनी सांगितले.
सभेस ग्रामपंचायत सदस्य राजू भानुसे, सतीश बागणे, अशोक सावळे, विलास होनमोरे, अस्लम मुजावर, महाबुबी मुजावर, मंगल खांडेकर, रुपाली माळी, लता जत्ते, स्मिता कुंभारकर, अनिता माळी, सुरेखा कुंभार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)