सांगली जिल्ह्याला चार मंत्रिपदांची अपेक्षा, प्रबळ दावेदार कोण.. जाणून घ्या
By संतोष भिसे | Published: November 25, 2024 06:07 PM2024-11-25T18:07:25+5:302024-11-25T18:08:20+5:30
सुरेश खाडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी सर्वाधिक
संतोष भिसे
सांगली : जिल्ह्यात भाजप महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर मंत्रिपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, खानापूरचे सुहास बाबर व जतचे गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील आठ जागांपैकी पाच ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकला आहे. महायुतीचे सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे पुन्हा निवडून आले आहेत. गाडगीळ तिसऱ्यांदा, तर खाडे मिरजेतून चौथ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी खाडे यांच्या सहा महिन्यांसाठी समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्रीपद होते. त्यानंतर ते कामगार मंत्री म्हणून कार्यरत होते. नव्या टर्ममध्ये त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी सर्वाधिक आहे. शिवाय सलग पाचवेळा आमदार आणि मंत्रीपदाचा दीर्घ अनुभव पाहता त्यांचा वाट्याला वजनदार खाते येऊ शकते.
आमदार गाडगीळ यांना गेल्या टर्ममध्येच मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. या निवडणुकीत त्यांना हॅटट्रीक मिळविल्याने मंत्रिपदाची दावेदारी प्रबळ झाली आहे. १० वर्षांचा विधीमंडळाचा अनुभव पाहता त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.
आटपाडी तालुक्यातून जतमध्ये जाऊन आमदारकीला गवसणी घातलेल्या गोपीचंद पडळकर हेदेखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जाते. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. आजवर त्यांनी विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे. आता थेट लोकांतून निवडून आल्याने मंत्रिपदाची दावेदारी वाढली आहे. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते.
अनिल बाबर यांच्या निष्ठेचे फळ
खानापूरचे सुहास बाबर यांनी जिल्ह्यात विक्रमी मताधिक्य मिळविले आहे. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा वारसदार म्हणून सुहास यांना राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनिल बाबर एकनिष्ठ राहिले होते. शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही अनिल बाबर पहिल्याच टप्प्यात त्यांच्यासोबत गेले होते. या निष्ठेची पावती म्हणून सुहास बाबर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.