सुरेश खाडेंच्या मंत्रीपदी निवडीने मिरजेत जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:00 AM2019-06-17T00:00:52+5:302019-06-17T00:00:57+5:30
मिरज : आ. सुरेश खाडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर रविवारी मिरजेत भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून, त्यांच्या ...
मिरज : आ. सुरेश खाडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर रविवारी मिरजेत भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून, त्यांच्या निवडीचे स्वागत केले. श्रीकांत चौकात कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करीत जल्लोष केला. खाडे यांचे मिरजेत आगमन झाल्यानंतर मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
मंत्री म्हणून शपथविधीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातून शनिवारी दुपारी निमंत्रण मिळाल्यानंतर खाडे कुटुंबीयांसह मुंबईला रवाना झाले. शपथविधीस उपस्थित राहण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच व भाजप पदाधिकारी, कार्यकर्तेही मुंबईला गेले होते. आ. खाडे यांची राज्यमंत्री, की कॅबिनेट मंत्रीपदी निवड होणार, याबाबत उत्सुकता होती. रविवारी सकाळी खाडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणता विभाग मिळणार, याची चर्चा सुरू होती.
श्रीकांत चौकात भाजपचे ओंकार शुक्ल, जयगोंड कोरे, ओंकार शुक्ल, चंद्रकांत मैगुरे, ऋषिकेश कुलकर्णी, भैया खाडिलकर, भाऊसाहेब नरोटे, सुनील कुलकर्णी, राम भंडारे, श्याम भंडारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाईचे वाटप केले. गत विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षात अनेकदा भाऊंना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रीपदाला खाडे यांनी गवसणी घातल्याने भाजप कार्यकर्त्यांना आनंद झाला.
गेल्या पाच वर्षात मिरज मतदार संघात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका व लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळविले आहे. गत महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांचा विकास कामांसाठी निधी मिळण्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. मात्र खाडे यांना मंत्रीपद मिळाल्याने आयात नगरसेवकांचा बंडाचा पवित्रा आता थंड होणार आहे. सुमारे ५० वर्षांनंतर मिरजेला प्रथमच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने खाडे यांचे जोरदार स्वागत होणार आहे. मुंबईत अधिवेशनास उपस्थित राहून पुढील आठवड्यात मिरजेत आगमन झाल्यानंतर मिरवणूक काढण्याची तयारी केली आहे.