सुरेशभाऊ, मेहेरबानी करा अन्् गप्प बसा;संजयकाकांनी खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:54 PM2019-02-03T23:54:05+5:302019-02-03T23:54:11+5:30
तासगाव : बेदाणा असोसिएशनच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात नेते मनोगतातून भावना व्यक्त करत असतानाच, खासदार संजय पाटील यांनी व्यासपीठावरच आ. सुरेश ...
तासगाव : बेदाणा असोसिएशनच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात नेते मनोगतातून भावना व्यक्त करत असतानाच, खासदार संजय पाटील यांनी व्यासपीठावरच आ. सुरेश खाडे यांना खडसावले. ‘सुरेशभाऊ... जरा माणसं बोलत आहेत, नेत्यांना प्रश्न समाजावून सांगूद्यात. आम्ही आणलेला उद्देश सफल होऊद्या. तेव्हा मेहेरबानी करा आणि गप्प बसा,’ अशा शब्दात त्यांना खडसावले. खासदार पाटील यांच्या या वक्तव्याने अंतर्गत मतभेदाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
शनिवारी तासगाव येथील बेदाणा सौदा हॉलमध्ये सांगली - तासगाव बेदाणा मर्चंटस् असोसिएशनचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी स्वत: खासदार संजय पाटील यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना तासगावात आणण्यासाठी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून खासदार संजय पाटील यांनी केंद्रातील दोन बड्या मंत्र्यांना शनिवारी तासगावात आणले. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यासाठी या मंत्र्यांकडून भरीव घोषणा होईल, ही अपेक्षा होती. काकांच्या आग्रहाला मान देत, दोन्ही मंत्री तासगावात आले. बेदाणा व्यापाऱ्यांवर लादलेला सेवा कर रद्द व्हावा, लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यासाठी या मंत्र्यांकडून भरीव घोषणा व्हावी, या अपेक्षेने खासदारांनी मंत्र्यांना तासगावात आणले होते.
कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर खासदार संजय पाटील यांनी जिल्ह्यासाठी झालेल्या कामांची माहिती देत, भरीव विकासासाठी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी दुष्काळी भागातील बेदाणा व्यवसायाची यशस्वी वाटचाल व शेतीसमोरील प्रश्न आणि समस्यांकडे नामदार सुरेश प्रभू यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खासदार संजय पाटील बोलत होते; पण तिकडे व्यासपीठावर मात्र स्वागत सोहळेच सुरु होते. अशातच आ. सुरेश खाडे यांच्या मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी कानगोष्टी सुरु होत्या. त्यामुळे खा. पाटील यांच्या मनोगताकडे प्रभू यांचे लक्ष नव्हते. हे लक्षात आल्याने संजय पाटील यांचा पारा चढला. त्यांनी व्यासपीठावरील दोन मंत्री आणि उपस्थित नागरिकांसमोरच आमदार खाडे यांना खडसावले. ‘सुरेशभाऊ जरा माणसं बोलताहेत, आम्हाला नेत्यांना प्रश्न समाजावून सांगूद्यात. त्यांना इथे आणण्याचा उद्देश सफल होऊद्या, जरा मेहेरबानी करा आता. मी भागातील गंभीर प्रश्न मंत्रीमहोदयांच्या समोर मांडतोय. तेव्हा मेहेरबानी करा आणि ते तुम्हीही ऐका आणि त्यांनाही ऐकूद्या,’ अशा शब्दात त्यांना सुनावले.
संजय पाटील यांच्या संतप्त वक्तव्यानंतर मात्र सर्वत्र शांतता पसरली. त्यांच्या वक्तव्यानंतर आ. खाडे यांचा चेहरा पडला. त्यानंतर कार्यक्रम संपेपर्यंत त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.
खासदार पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मात्र कार्यक्रमाचा नूरच पालटला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच भाजपच्या पक्षांतर्गत नेत्यांतील गटबाजीच्या चर्चेला सुरुवात झाली. त्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.
आमदारांकडे दुर्लक्ष
केंद्रीय मंत्री बाजार समितीच्या आवारात कार्यक्रमासाठी येणार म्हटल्यावर राष्टÑवादीच्या आमदार सुमनताई पाटील या बाजार समितीच्या पदाधिकाºयांसह स्वागतासाठी बाजार समितीसमोर थांबल्या होत्या. मंत्र्यांचा ताफा आमदारांसमोरून गेला, मात्र आमदारांना दुर्लक्षित करून गाड्या कार्यक्रम स्थळाकडे गेल्या.
मंत्र्यांकडून घोषणा झाल्या
जिल्ह्यासाठी ठोस योजना मिळेल, या हेतूने खा. पाटील यांनी मंत्र्यांना तासगावात आणले होते. दोन्ही मंत्र्यांनी जिल्ह्यासाठी ठोस आश्वासन दिले. मंत्री प्रभू यांनी लवकरच जिल्ह्यात दळणवळणाला चालना देण्यासाठी विमानसेवा, तसेच द्राक्ष निर्यातीसाठी अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले. तसेच केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत यांनी, जिल्ह्यात लवकरच स्वतंत्र बेदाणा हब उभारणार असल्याची घोषणा केली. यामुळे खासदारांचा उद्देश सफल ठरला आहे, असे सांगितले जात आहे.