सांगली महापालिकेच्या दुर्लक्षामुळे टर्फ विकेट गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:02 AM2019-03-10T00:02:23+5:302019-03-10T00:07:33+5:30
क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर, जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह अनेकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेल्या सांगलीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेटची अवस्था सध्या दयनीय झाली
शीतल पाटील ।
सांगली : क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर, जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह अनेकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेल्या सांगलीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेटची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. महापालिकेने या विकेटची देखभाल न केल्याने तेथील गवत वाळून गेले आहे. त्यामुळे क्रीडांगणावर प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खेळाडंूमध्ये नाराजी पसरली असून रणजी ट्रॉफीसारखे राष्ट्रीय सामने भरविण्याचे स्वप्न अंधुक बनले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय हजारे ते स्मृती मानधनापर्यंत अनेक खेळाडूंनी सांगलीचे नाव क्रिकेट विश्वात चमकविले आहे. आजही छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर हजारो खेळाडू क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील काही खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरीही करीत आहेत. पण या खेळाडूंना सध्या मॅटवर सराव करावा लागतो. कारण क्रीडांगणावरील टर्फ विकेटच सध्या गायब झाली आहे.
काँग्रेसचे नेते मदन पाटील यांनी क्रिकेट खेळ रुजविण्यासाठी शिवाजी क्रीडांगणावर टर्फ विकेट बनवली होती. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामने अशाच विकेटवर होतात. सांगलीच्या खेळाडूंना एक चांगली संधी यानिमित्ताने मिळाली होती. या टर्फ विकेटच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेवर आहे. काही वर्षापर्यंत महापालिकेने ही विकेट जपली होती.
क्रीडांगणाच्या मधोमध हिरवीगार विकेट क्रिकेट खेळाडूंना आकर्षित करीत असे. याच विकेटवर सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी, अर्जुन रणतुंगा, जयसूर्या यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी फलदांजीही केली आहे. खुद्द रमाकांत आचरेकर यांनीही या विकेटचे कौतुक केले होते. पण कालांतराने महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही विकेट अत्यंत खराब झाली आहे. विकेटवरील गवत वाळून गेले आहे. त्याची निगा राखली गेलेली नाही. विकेटवर खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे खेळाडूंना ती वापरताच येत नाही, अशी स्थिती आहे. पण याकडे महापालिकेचे लक्षच नाही.
मॅटवर सराव करण्याची वेळ
सांगलीमधून अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर सामने खेळण्यासाठी जातात. तिथे त्यांना टर्फ विकेटवर खेळावे लागते. पण सांगलीत टर्फ विकेट नसल्याने त्यांना मॅटवर सराव करावा लागतो. पुणे-मुंबईस खेळावयास गेल्यानंतर या खेळाडूंना अडचणीना सामोरे जावे लागते. सांगलीत सध्या विलिंग्डन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर टर्फ विकेट आहे. काही खेळाडू तिथे जाऊन सराव करतात. महापालिकेने तातडीने लक्ष घालून शिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेट पुनरुजीवित करावी, अशी मागणी शहरातील क्रिकेट खेळाडूंमधून होत आहे.
शिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेट वाचविण्यासाठी सर्वच संघटना, क्रीडाप्रेमींनी एकत्र येण्याची गरज आहे. मॅट व टर्फ विकेट या दोन्हीवरील सरावात फरक पडतो. टर्फ विकेटवरच सामने होत असल्याने सांगलीची विकेट पुनरुजीवित झाली तर त्याचा फायदा खेळाडूंना निश्चित होईल. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा.
- अनिल जोब, क्रिकेट प्रशिक्षक
शिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेट पुनरुजीवित करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. तेथील तीनही पिच दुरुस्त केले जातील. हे काम जूनमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
- अमजद जेलर, क्रीडाधिकारी, महापालिका
सांगलीतील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरील टर्फ विकेटची दुरवस्था झाली आहे. मैदानावरील गवत वाळून गेले असून, डागडुजीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.