अहो आश्चर्यम, जिल्ह्यात फक्त २६५ रुग्णालये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:30 AM2021-01-08T05:30:55+5:302021-01-08T05:30:55+5:30
सांगली : पश्चिम महाराष्ट्राची आरोग्यपंढरी ठरलेल्या सांगली जिल्ह्यात फक्त २६५ खासगी रुग्णालये आहेत! वाचून धक्काच बसला ना ? ...
सांगली : पश्चिम महाराष्ट्राची आरोग्यपंढरी ठरलेल्या सांगली जिल्ह्यात फक्त २६५ खासगी रुग्णालये आहेत! वाचून धक्काच बसला ना ? पण वस्तुस्थिती अशीच आहे. जिल्हा परिषदेकडील नोंदींनुसार दहा तालुक्यांत मिळून इतकीच खासगी रुग्णालये आहेत.
अर्थात, यामध्ये महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांचा समावेश नाही. ग्रामीण भागातील सर्व खासगी रुग्णालयांची नोंद बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार जिल्हा परिषदेत आरोग्याधिकाऱ्यांकडे करावी लागते. त्यानुसार फक्त २६५ रुग्णालयांची नोंद आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाखांवर गेली आहे. गल्लीबोळांत छोटी-मोठी रुग्णालये सुरू झाली आहेत; पण सर्वांनी नोंदच केली नसावी अशी शक्यता आहे.
गेल्या वर्षात किती नोंदणी झाली ?
गेल्या वर्षभरात नव्याने रुग्णालयांची नोंदणी झाली. त्याशिवाय जुन्यांचे नूतणीकरणही झाले. येत्या मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या रुग्णालयांची यादी करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यात महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांचा समावेश नाही.
नोंदणी न केल्यास होणारी कारवाई...
खासगी रुग्णालयांना प्रत्येक दोन वर्षांनी जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागते. न केल्यास मुदतीनंतर दररोज ५० रुपयांप्रमाणे दंड आकारणी सुरू राहते. प्रत्येक मार्चला वर्षपूर्ती होते. सध्या जिल्हा परिषदेत रुग्णालयांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
------------